ओटीटी माध्यम म्हणजे ‘ओव्हर द टॉप’, ज्यावर प्रेक्षकांना विविध प्रकारचा आशय पाहता येतो. क्राइम, थ्रिलर, अॅक्शन आणि हॉररसारखे अनेक प्रकारचे कंटेंट या माध्यमावर सहज उपलब्ध असतात. मात्र, इतक्या विविधतेमुळे काय पाहावे, हा प्रश्न अनेकदा पडतो. तुमच्या या प्रश्नाचे उत्तर आम्ही या आठवड्यातील काही निवडक सिनेमा आणि मालिकांच्या माध्यमातून देणार आहोत. या आठवड्यात तुम्ही हटके आशयासह अॅक्शन आणि थ्रिलर कथा अनुभवू शकता.
नेटफ्लिक्सवरील ‘द मॅन हू लव्हड यूएफओज’
१९८०च्या उत्तरार्धात अर्जेंटिनामध्ये घडणारी ही कथा एका पत्रकाराच्या परग्रहवासीयांवरील संशोधनाभोवती फिरते. पुराव्यांचा अभाव असल्यानं त्याचं संशोधन थांबण्याच्या मार्गावर येतं, पण नंतर तो स्वतःच बनावट पुरावे तयार करण्याचा निर्णय घेतो. लिओनार्डो स्बाराग्लिया मुख्य भूमिकेत असलेला हा चित्रपट अर्जेंटिनातील प्रसिद्ध पत्रकार जोस दे झेर यांच्या जीवनावर आधारित आहे. जोस दे झेर यांनी ८०च्या दशकात अर्जेंटिनातील दूरदर्शनवर परग्रहवासीयांवरील सर्वात गाजलेला कार्यक्रम तयार केला होता. डिएगो लर्मन यांनी दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटाचं चित्रीकरण कॉर्डोबा, सॅन लुईस, मेंडोझा आणि ब्यूनस आयर्स येथे झालं आहे. यात सर्जियो प्रिना, ओस्मार न्यूनेझ, रेनेटा लर्मन, मारिया मर्लिनो, ऑगस्टिन रिटानो आणि नॉर्मन ब्रिस्की यांच्याही भूमिका आहेत.
‘सेल्फ-पोर्ट्रेट अॅज अ कॉफी-पॉट’
विल्यम केंट्रिज या प्रसिद्ध दक्षिण आफ्रिकन कलाकाराच्या ‘सेल्फ-पोर्ट्रेट अॅज अ कॉफी-पॉट’ या नऊ भागांच्या विस्तृत मालिकेची स्ट्रीमिंग १८ ऑक्टोबरपासून म्युबीवर उपलब्ध आहे. केंट्रिज यांना त्यांच्या अॅनिमेटेड ड्रॉइंग्ज, शिल्पकला, रंगमंच आणि ऑपेरा निर्मितीसाठी ओळखले जाते. २०२० ते २०२२ दरम्यानच्या कोविड-१९ महामारीच्या काळात जोहान्सबर्गमधील त्यांच्या स्टुडिओमध्ये चित्रीत झालेली ही मालिका चार्ली चॅपलिन, ड्झिगा व्हर्टोव्ह यांच्या नवकल्पनांवर आधारित आहे. या मालिकेत विनोदी, तत्त्वज्ञान, राजकीय आणि कलात्मक विचारांचे मिश्रण आहे, ज्यात कल्पनाशक्ती आणि कलात्मक स्वातंत्र्याचा उत्सव साजरा केला आहे.
हेही वाचा…‘द फॅमिली मॅन ३’मध्ये दिसणार दोन खलनायक; जयदीप अहलावतबरोबर ‘या’ अभिनेत्रीची वर्णी
‘स्नेक्स अँड लॅडर्स’
२०००च्या दशकाच्या मध्यावर घडणारी ‘स्नेक्स अँड लॅडर्स’ ही एक डार्क ह्युमर-थ्रिलर मालिका आहे. ही मालिका चार शालेय मित्रांच्या जीवनाचा प्रवास दाखवते, ज्यात ते अनेक चुकीचे निर्णय घेतात असा आशय दाखवण्यात आला असून यात त्यांच्या चुकांचा त्यांच्या आयुष्यावर होणारा परिणाम दाखवण्यात आला आहे. या मालिकेचे दिग्दर्शन अशोक वीरप्पन, भारत मुरलीधरन आणि कमला अल्केमिस यांनी केले आहे. यामध्ये नवीद चंद्रा, नंदा, मनोज भारतिराजा, श्रींदा आणि श्रीजित रवी यांच्यासारख्या प्रमुख कलाकारांच्या भूमिका आहेत. ही मालिका तामिळ भाषेत प्राईम व्हिडीओवर उपलब्ध आहे आणि तेलुगु, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषेत डबही केली गेली आहे.
‘पॅरिस हॅज फॉलन’
‘पॅरिस हॅज फॉलन’ ही एक थरारक कथा आहे, ज्यात दहशतवादी गट पॅरिसमधील एका उच्च-स्तरीय कार्यक्रमावर हल्ला करतो. हल्ल्याचे नेतृत्व सूड घेऊ पाहणारा जेकब पिअर्स करतो. फ्रेंच गृह मंत्री त्याच्या हल्ल्याचे लक्ष्य बनतात. सुरक्षा अधिकारी व्हिन्सेंट तालेब आणि एमआय-६ एजंट झारा टेलर मिळून या योजना रोखण्याचा प्रयत्न करतात. शॉन हॅरिस, टेवीक जलाब आणि रितु आर्या यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. हा थरार लायन्सगेट प्लेवर उपलब्ध आहे.