रवी जाधव दिग्दर्शित ‘ताली’ या वेब सीरिजची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. जिओ सिनेमावर प्रदर्शित झालेल्या या सीरिजला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही सीरिज तृतीयपंथीयांच्या हक्कासाठी लढणाऱ्या समाजसेविका गौरी सावंत यांच्या जीवनावर आधारित आहे. पहिल्यांदा ‘ताली’ पाहिल्यावर गौरी सावंत यांनी अभिनेत्री सुश्मिता सेनचं भरभरून कौतुक केलं होतं. अलीकडेच एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत गौरी सावंत यांनी सुश्मिता सेनचा स्वभाव, पहिली भेट, तिने साकारलेली भूमिका याविषयीचं आपलं मत मांडलं आहे.
हेही वाचा : तृतीयपंथी दाढी कसे करतात? गौरी सावंत यांनी सांगितलं वास्तव; म्हणाल्या, “ब्लेडने दाढी केली तर…”
‘ताली’ सीरिजच्या निमित्ताने गौरी सावंत आणि अभिनेत्री सुश्मिता सेन यांची पहिल्यांदा तिच्या खार येथील घरात भेट झाली होती. याविषयी गौरी सावंत सांगतात, “अफिफा नडियादवालाने जेव्हा पहिल्यांदा माझी गोष्ट घेतली तेव्हा एवढी मोठी सीरिज होतेय याची कल्पना मला नव्हती. शेवटपर्यंत सुश्मिता सेन माझी भूमिका करणार आहे हे मला माहिती नव्हतं. सगळ्या गोष्टी निश्चित झाल्यावर सुश्मिताला भेटण्यासाठी मी त्यांच्या खारच्या घरी पार्लेजीचा साधा बिस्किटचा पुडा घेऊन गेले होते.”
हेही वाचा : “‘जवान’ला ठरवून डोक्यावर घेतलं”, किरण मानेंची पोस्ट चर्चेत; म्हणाले, “भ्रष्ट नेत्यांकडून…”
गौरी सावंत पुढे म्हणाल्या, “घराचा दरवाजा सुश्मिताने स्वत: उघडला होता. आत गेल्यावर “तू तृतीयपंथीयाची भूमिका का करत आहेस?” हा प्रश्न तिला मी सगळ्यात आधी विचारला. यावर सुश्मिताने दोन वेळा केस उडवून मला, “कारण तू आई आहेस आणि मी सुद्धा एक आई आहे.” असं उत्तर दिलं होतं. तिने आडेवेढे, खोटेपणा, तुम्हाला मी न्याय देऊ इच्छिते असं काहीच रडगाणं न गाता केस उडवून खरं उत्तर दिलं. तिची हीच गोष्ट मला खूप आवडली. त्यादिवशी आमच्यात खूप वेळ बोलणं झालं… आमच्या स्वभावातील अनेक गोष्टी सारख्या होत्या. ‘ताली’चं शूटिंग सुरु असताना एक दिवस तिला १०२ ताप होता. तेव्हा तिने पावसात उभं राहून सीन शूट केला आहे. हे आम्हाला न्याय मिळण्यासारखंच आहे.”
हेही वाचा : “मराठी चित्रपटसृष्टीत त्याच्याइतकं…”, गश्मीर महाजनीने केलं प्रवीण तरडेंचं कौतुक
“विश्वसुंदरी सुश्मिता सेनने माझी भूमिका साकारणं हे खरंच आमच्या समाजाला न्याय मिळण्यासारखं आहे. तृतीयपंथी भूमिका साकारण्यासाठी एका महिलेने धाडस दाखवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. ‘ताली’ सीरिजचे पहिले दोन एपिसोड्स पाहूनच मला खूप रडू आलं…मी खूप रडत होते. तृतीयपंथी सुद्धा सामान्य माणसाच्या पोटी जन्माला येतात हे या सीरिजमुळे लोकांना समजलं असेल.” असं गौरी सावंत यांनी सांगितलं.