वेब विश्वातील लोकप्रिय अभिनेता सुमीत व्यास सध्या त्याच्या वेब सीरिजचे प्रमोशन करण्यात व्यग्र आहे. त्याच्या ‘ट्रिपलिंग’ या सुपरहिट सीरिजचा तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २०१६ मध्ये ही सीरिज यूट्यूबरवर प्रदर्शित आली होती. या सीरिजमध्ये सुमीतने चंदन शर्मा हे मुख्य पात्र साकारले आहे. अभिनयासह त्याने या सीरिजचे लेखन देखील केले आहे. ‘ट्रिपलिंग’चे आधीचे दोन्ही सीझन झी 5 वर उपलब्ध आहेत.
टिव्हीएफच्या ‘पर्मनंट रूममेट्स’ या सीरिजमुळे सुमीतला प्रसिद्धी मिळाली. वेब सीरिज व्यतिरिक्त त्याने काही चित्रपटांमध्येही काम केले आहे. तो ओटीटीवरचा आघाडीचा अभिनेता आहे. एका मुलाखतीमध्ये त्याने या क्षेत्रामध्ये काम करण्याचा अनुभव सांगितला. या पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान त्याने मला टेलिव्हिजनपेक्षा वेब सीरिज आणि चित्रपटांमध्ये काम करणे अधिक प्रिय आहे असे वक्तव्य केले. तो म्हणाला, “टेलिव्हिजनवरच्या कार्यक्रमाचे स्वरुप खूप वेगळे असतात. त्यांच्या कामाची व्याप्ती अन्य माध्यमांपेक्षा वेगळी असते. या कार्यक्रमातील कामाचे प्रमाणही अधिक असते. या एका कारणामुळे मला टेलिव्हिजनमध्ये काम करायची इच्छा होत नाही.”
आणखी वाचा – “या महाराष्ट्राने मला … ” जेव्हा अमिताभ बच्चन ‘या’ मराठी चित्रपटात झळकले होते
तो पुढे म्हणाला, “खरं सांगायचं तर मी फार आळशी आहे. मला जास्त काम करणं जमत नाही. टिव्ही शो करणारे लोक खूप मेहनती आहेत. वेब सीरिज आणि चित्रपट या दोन्ही माध्यमांमध्ये काम करताना मजा येते. जर माझी भूमिका चांगली असेल आणि मला नवीन काहीतरी करायची संधी मिळत असेल, तर मी ती भूमिका चित्रपटातली आहे की वेब सीरिजमधली आहे याने मला फरक पडत नाही. शेवटी प्रत्येक कलाकाराला कलात्मक अनुभव हवा असतो असे मला वाटते.”
सुमीतने ‘इंग्लिश विंग्लिश’, ‘पर्चड’, ‘मेड इन चायना’, ‘वीरे दी वेडिंग’ अशा काही चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याने ‘कसम से’, ‘लौट आओ त्रिशा’, ‘चंद्रगुप्त मौर्य’, ‘स्टोरीज बाय रविंद्रनाथ टागोर’ यांसारख्या मालिकाही केल्या आहेत. त्याच्या ‘ट्रिपलिंग’ या वेब सीरिजचा तिसरा सीझन २१ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.