भारतीय ओटीटी विश्वात स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या ‘द व्हायरल फिव्हर’ अर्थात TVF चं योगदान फार मोठं आहे. सुरुवातीच्या काळात जेव्हा फक्त युट्यूबच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयोग केले जायचे तेव्हापासूनच टीव्हीएफची जबरदस्त चर्चा आहे, अन् आता तर ते ओटीटी क्षेत्रातील अन् वेबसीरिजमधील अत्यंत तगडे स्पर्धक बनले आहेत. ‘द पिचर्स’, पेरमनन्ट रूममेट’, ‘कोटा फॅक्टरी’, ‘The Aspirants’सारख्या कित्येक वेबसीरिजमधून टीव्हीएफने लोकांचं मनोरंजन केलं आहे.
आणखी वाचा : “माझ्या पैशाने मी काय करायचं हे सांगणारे तुम्ही कोण?” इंडस्ट्रीतील नेपोटीजमबद्दल झोया अख्तर स्पष्टच बोलली
यापैकी टीव्हीएफची आणखी एक सीरिज जी फारच गाजली ती म्हणजे ‘पंचायत’. या सीरिजचे दोन सीझन आले आणि दोन्ही सीझन प्रचंड गाजले. यातील पात्र, त्यांची साधी जीवनशैली, भारतीय गावांचं अचूक चित्रण अन् एकूणच विनोदी पद्धतीने वेगवेगळ्या गंभीर मुद्द्यांवर चर्चा करणाऱ्या या सीरिजला लोकांनी चांगलंच पसंत केलं. या सीरिजचा दूसरा सीझन प्रेक्षकांना चांगलाच भावुक करून गेला, तेव्हापासूनच याच्या पूढील सीझनची चाहते आतुरतेने वाट बघत आहेत.
नुकतंच ‘पंचायत ३’बद्दल नवी अपडेट समोर आली आहे. नुकतंच प्राइम व्हिडीओने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून ‘पंचायत ३’चा फर्स्ट लुक शेअर केला आहे. यात पहिल्या फोटोमध्ये फुलेरा गावच्या पंचायत सचिव अभिषेक त्रिपाठी त्याच्या नेहमीच्या मोटरसायकलवर पाहायला मिळत आहे, तर याच्या पूढील फोटोमध्ये बनराकस, विनोद आणि माधव यांची पात्रं पाहायला मिळत आहे. या फोटोमध्ये मागे भिंतीवर एक स्लोगन लिहिलेला पाहायला मिळत आहे. “ठोकर लगती है तो दर्द होता है, तभी मनुष्य सिख पाता है.”असं ते वाक्य आपल्याला पाहायला मिळत आहे.
‘पंचायत ३’चा हा फर्स्ट लुक चाहते चांगलेच खुश झाले आहेत, या तिसऱ्या सीझनमध्ये मनोरंजनाचा ट्रिपल डोस प्रेक्षकांना मिळणार असल्याची खात्री आहे. नोव्हेंबरमध्ये या तिसऱ्या सीझनचं चित्रीकरण पूर्ण झाल्याचा व्हिडीओ नीना गुप्ता यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला होता. अद्याप मेकर्सनी ‘पंचायत ३’च्या प्रदर्शनाच्या तारखेबद्दल कसलाही खुलासा केला नसल्याने चाहते संभ्रमात पडले आहेत.
‘पंचायत’चा पहिला सीझन २०२० मध्ये प्रदर्शित झाला होता अन् त्यालाहि उत्तम प्रतिसाद मिळाला होता. खासकरून कोविड काळात या सीरिजची लोकप्रियता अधिक वाढल्याचं पाहायला मिळतं. या सीरिजमध्ये जितेंद्र कुमार, रघुवीर यादव, नीना गुप्ता, फैजल मलिक, चंदन रॉय, सांविका यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तिसऱ्या सीझनचा फर्स्ट लुक पाहून चाहते चांगलेच खुश झाले असून या नव्या सीझनची ते आतुरतेने वाट बघत आहेत.