‘द व्हायरल फिव्हर’ म्हणजेच ‘टिव्हीएफ’ (TVF) या यूट्यूब चॅनलने डिजीटल विश्वामध्ये क्रांती घडवून आणली. २०१० मध्ये काही व्हिडीओ यूट्यूबवर पोस्ट करत टिव्हीएफची सुरुवात झाली. त्यांच्या टीमने आतापर्यंत ‘पिचर्स’, ‘कोटा फॅक्टरी’, ‘ये है मेरी फॅमिली’, ‘ट्रिपलिंग’, ‘पंचायत’, ‘अॅस्पिरेंट्स’ अशा एकापेक्षा एक दर्जेदार वेबसीरिजची निर्मिती केली आहे. टिव्हीएफने स्वतंत्र ओटीटी प्लॅटफॉर्मदेखील सुरु केला आहे.
टिव्हीएफची ‘ट्रिपलिंग’ (Tripling) ही वेबसीरिज खूप गाजली. या वेबसीरिजची कथा चंदन, चंचल आणि चितवन या तीन अतरंगी भावंडांच्या अवतीभोवती फिरते. एकमेकांपासून लांब राहणारे हे त्रिकुट अनावधानाने एकत्र येऊन धमाल करत असल्याचे पहिल्या सीझनमध्ये दिसले होते. हा सीझन यूट्यूबवर प्रदर्शित करण्यात आला होता. रोड ट्रिप हा या सीझनचा गाभा होता. पुढे तीन वर्षांनंतर या सीरिजचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला. फॅमिली ड्रामा हा केंद्रबिंदू पकडून दुसऱ्या सीझनची कथा लिहिण्यात आली. या लोकप्रिय वेबसीरिजचे दोन्ही सीझन झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत.
ट्रिपलिंगच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या सीरिजचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. टिव्हीएफने सोशल मीडियावर ट्रिपलिंगच्या तिसऱ्या सीझनचा टीझर पोस्ट केला आहे. टीझरच्या सुरुवातीला चंदन त्यांच्या आई-वडिलांना भेटायचा प्लॅन करताना दिसतो. या ट्रिपसाठी तो चंचल आणि चितवनला सोबत घेतो. घरी जाण्यासाठी चितवन गाडीऐवजी साईडकार असलेली बाईक घेऊन येतो. घरी पोहचल्यावर संपूर्ण कुटुंब फॅमिली ट्रेक करायला निघतात. टीझरमध्ये रोड ट्रिप आणि ट्रेक यांमधील काही सीन्स दाखवण्यात आले आहेत.
आणखी वाचा – ‘मी टू’संबंधी आरोपांवर साजिद खानने सोडलं मौन, “मी त्यावेळी कामासाठी…”
ट्रिपलिंगमध्ये अभिनेता सुमीत व्यासने चंदन हे पात्र साकारले आहे. त्याने या सीरिजचे लेखन देखील केले आहे. मानवी गाग्रू ही चंचलच्या, तर अमोल पराशर हा चितवनच्या भूमिकेमध्ये आहे. कुमूद मिश्रा, शेरनाज पटेल आणि कुणाल रॉय कपूर या कलाकारांनी सहाय्यक व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. तिसऱ्या सीझनचे दिग्दर्शन नीरज उधवानी यांनी केले आहे.