बिग बॉस ओटीटीवरील तिसऱ्या पर्वाला सुरुवात झाली असून आता सहभागी झालेल्या स्पर्धकांची चांगलीच चर्चा सुरू आहे. या पर्वात सोशल मीडियावरील अनेक इनफ्युएन्सरदेखील सहभागी झाले आहेत. त्यापैकी अरमान मलिक आणि त्याच्या दोन पत्नींची चांगलीच चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर अरमान मलिकच्या बहुपत्नीत्वावरून त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. मात्र, विविध कारणांमुळे सतत चर्चेत असणाऱ्या उर्फी जावेदने अरमान मलिक आणि त्याच्या दोन पत्नींच्या समर्थनार्थ आपली भूमिका मांडली आहे.

इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या स्टोरीमध्ये उर्फी म्हणते, “गेल्या काही काळापासून मी या कुटुंबाला ओळखते आणि मी खात्रीने सांगू शकते की आजपर्यंत भेटलेल्या सर्वोत्तम लोकांपैकी ते एक आहेत. जर ते तिघे एकमेकांसोबत खूश आहेत तर आपण त्यांच्या आयुष्यावर बोलणारे कोण आहोत? बहुपत्नीत्वाची परंपरा आपल्याकडे फार वर्षांपासून अस्तित्वात आहे आणि आजही काही ठिकाणी बहुपत्नीत्वाची पद्धत प्रसिद्ध आहे. जर त्या तिघांना एकमेकांची काही अडचण नाही, तर आपण त्यावर बोलणारे कोणीही नाही”, असे म्हणत उर्फीने अरमान मलिक, पायल मलिक आणि क्रितिका यांना आपला पाठिंबा दिला आहे. याबरोबरच, उर्फी सामाजिक, राजकीय मुद्द्यांवर आपले मत मांडताना दिसत असते. आता अरमान आणि त्याच्या कुटुंबाला तिने पाठिंबा दिल्यामुळे उर्फी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

हेही वाचा : ‘गली बॉय चित्रपटाचा माझ्या खाजगी आयुष्यावर परिणाम झाला’ रॅपर नेझीने सांगितली आपबिती

याआधी टीव्ही अभिनेत्री आणि बिग बॉसच्या १३ आणि १४ व्या पर्वाची स्पर्धक देबोलिना भट्टाचार्यने ट्विट करत अरमान मलिक आणि त्याच्या दोन पत्नींवर टीका केली होती. तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते की, बहुपत्नीत्व ही चुकीची पद्धत होती आणि कायम चुकीचीच राहणार आहे. हे कुठेतरी थांबायला पाहिजे. कधीतरी याच बायकांनी आम्हालादेखील दोन नवरे हवे आहेत असे म्हटले तर त्यावेळी त्याचा आनंद घ्या”, अशा खरमरीत शब्दात टीका केली आहे. अरमान मलिक हा प्रसिद्ध यूट्यूबर असून त्याचे लाखो चाहते आहेत.

उर्फी जावेद इन्स्टाग्राम स्टोरी ( फोटो सौजन्य : इंडियन एक्स्प्रेस )

दरम्यान, बिग बॉसचे हे तिसरे पर्व चांगलेच चर्चेत आहे. अभिनेते अनिल कपूर या पर्वाचे सूत्रसंचालन करत असून कोणता स्पर्धक प्रेक्षकांचे मन जिंकण्यात यशस्वी ठरणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. पर्वाच्या सुरुवातीला १६ स्पर्धक यामध्ये सहभागी झाले होते. भारतीय बॉक्सर नीरज गोयत घराबाहेर पडला असून आता घरात १५ स्पर्धक उरले आहेत. स्पर्धकांच्या घरात होणाऱ्या अनेक संवादावरून घराबाहेर अनेक चर्चांना तोंड फुटताना दिसत आहे.