नितेश तिवारी दिग्दर्शित वरुण धवन आणि जान्हवी कपूरचा ‘बवाल’ चित्रपट २१ जुलै रोजी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाला. पती-पत्नीच्या एका सामान्य प्रेमकथेला अशा प्रकारे सादर करण्यात आलं आहे की ज्यामध्ये दुसऱ्या महायुद्धाची फोडणीही दिग्दर्शकाने दिली आहे. आता आश्चर्यकारक बातमी अशी आहे की हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवरून हटवण्याची मागणी होत आहे.
चित्रपटातील आधुनिक नातेसंबंध आणि दुसऱ्या महायुद्धादरम्यान अॅडॉल्फ हिटलरचे अत्याचार यांच्यात केलेली तुलना यावरून हा वाद अधिकच चिघळताना दिसत आहे. खरंतर, ज्यू मानवाधिकार संघटनेने हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवरून हटवण्याची मागणी केली आहे. यासह नितेश तिवारी यांच्यावर त्या युद्धात मारल्या गेलेल्या ज्यूंचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
‘बावल’ चित्रपटात एक दृश्य आहे ज्यात वरुण (अजय) आणि जान्हवी (निशा) परदेशवारीसाठी निघतात. ते त्या ठिकाणी पोहोचतात जिथे दुसरे महायुद्ध झाले होते. एका दृश्यात जान्हवी “आपण सगळेच काही प्रमाणात हिटलरसारखे आहोत ना?” असे म्हणताना दिसत आहे. मग ती म्हणते, “प्रत्येक नाते त्याच्या ऑशविट्झमधून जाते.” चित्रपटात गॅस चेंबरमध्ये दाखवण्यात आलेल्या क्रौर्याचा वापर दोघांमधील नातेसंबंध बदलण्यासाठी करण्यात आला असून त्यावर ज्यू मानवाधिकार संघटनेने आक्षेप घेतला आहे.
रब्बी अब्राहम कूपर, सायमन विसेन्थल सेंटरचे असोसिएट डीन आणि ग्लोबल सोशल ऍक्शनचे संचालक, यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मच्या या चित्रपटाच्या प्रसारणावर त्वरित बंदी घालण्याची मागणी केली आहे. “या चित्रपटाद्वारे दिग्दर्शकाने हिटलरच्या राजवटीत मारले गेलेल्या साठ लाख ज्यू आणि इतर लाखो लोकांच्या स्मृतीचा अपमान केला आहे,”असंही ते म्हणाले. याबरोबरच काल्पनिक कथेत हिटलर आणि दुसऱ्या महायुद्धाचे संदर्भ जोडून दिग्दर्शकाला प्रसिद्धी हवी असल्याचाही त्यांचा आरोप आहे.