अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाची वेब सीरिज ‘दहाड’ ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाली आहे. रीमा कागती दिग्दर्शित या वेब सीरिजला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. एक्सेल एंटरटेन्मेंट आणि टायगर बेबी प्रॉडक्शनच्या बॅनरखाली निर्मित ‘दहाड’ हा आठ भागांचा क्राइम ड्रामा आहे.
या मालिकेतून सोनाक्षीने डिजिटल डेब्यू केला आहे. या मालिकेत सोनाक्षी सिन्हाव्यतिरिक्त सोहम शाह, गुलशन देवैया आणि विजय वर्मा हे कलाकार मुख्य भूमिकांत आहेत. या मालिकेत सोनाक्षी सब-इन्स्पेक्टर अंजली भाटीची भूमिका साकारत आहे. या मालिकेत राजस्थानची पात्रे दाखवण्यात आली आहेत. सोनाक्षीच्या या वेब सीरिजवर चित्रपटनिर्माते विवेक अग्निहोत्री यांनी टीका केली आहे. अग्निहोत्री यांनी ट्वीट करत वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आलेल्या राजस्थानी पात्रांवर आक्षेप घेतला आहे. एवढेच नाही तर वेब सीरिजमधील सोनाक्षी सिन्हाच्या भूमिकेबाबतही अग्निहोत्री यांनी वक्तव्य केले आहे.
अग्निहोत्री यांनी ट्वीटमध्ये लिहिले आहे, बॉलीवूड कलाकारांना वाटते की, ते हुकूम… म्हारो… थारो… म्हणत राजस्थानी पात्र बनू शकतात. बाकीचे संवाद ते त्यांच्या पंजाबी, बॉम्बे, तामिळ, कन्नड उच्चारांत बोलू शकतात. अग्निहोत्री यांनी पुढे ट्वीटमध्ये लिहिले आहे. पोलीस बनण्यासाठी, तुम्हाला फक्त खूप मेकअपसह घट्ट बसणारे खाकी कपडे घालावे लागतील. जर तुम्ही काही राजस्थानी शब्द उच्चारले आणि अल्ट्रा मॉडर्न दिसणाऱ्या गोऱ्या आणि गोंडस शहरी कलाकारांना विनाकारण शिव्या दिल्या, तर प्रेक्षक इतके मूर्ख आहेत की ते कलाकार खरे राजस्थानी आहेत असे त्यांना वाटू लागेल.
हेही वाचा- “कधी कधी मला शाहरुख खानसारखं…”; ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाच्या यशाबाबत अदा शर्माचे मोठं वक्तव्य
विवेक अग्निहोत्रींनी पुढे लिहिले की, ‘राजस्थानच्या कडक उन्हात तुम्ही मेकअपचे इतके थर हाताळू शकत नाही. कृपया तुमच्या पाश्चात्त्य चित्रपटांच्या प्रेरणांना राजस्थानमध्ये बसवणे थांबवा. प्रेक्षकांना वेडे समजू नका. विवेक अग्निहोत्रींचे हे ट्वीट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.