तुम्हाला कोरियन ड्रामा पाहायला आवडत असेल किंवा तुम्ही अजून एकही के-ड्रामा पाहिला नसेल, तर दोन्ही बाबतीत तुम्ही नेटफ्लिक्सवर नुकतीच रिलीज झालेली ही सीरिज पाहू शकता. तुम्ही के-ड्रामाचे चाहते असाल तर ही सीरिज तुम्ही पाहिलेल्या सर्वोत्तम के-ड्रामापैकी एक असू शकते. कारण या सीरिजने आयएमडीबीवर सर्वाधिक रेटिंग मिळवले आहे.

आम्ही ज्या सीरिजबद्दल बोलतोय त्यात कोणतीही हिंसा, अश्लील दृश्ये, विकृती, ग्लॅमर काहीच नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण फॅमिली ड्रामा असलेल्या या सीरिजला IMDb वर ९.३ रेटिंग मिळाले आहे.

आम्ही ज्या कोरियन सीरिजबद्दल बोलत आहोत त्या सीरिजचं नाव ‘When Life Gives You Tangerines’ असं आहे. ही सीरिज सध्या ओटीटीवर ट्रेंडिंग आहे. या सीरिजने IMDb वरील रेटिंगचे रेकॉर्ड देखील मोडले आहेत. आधी ‘क्वीन ऑफ टियर्स’ आणि ‘स्क्विड गेम’ हे सर्वाधिक रेटिंग असलेले के-ड्रामा होते. पण आता रिलीज झालेली ही सीरिज ओटीटीवर धुमाकूळ घालत सर्वाधित रेटिंग मिळवण्यात यशस्वी ठरली आहे. तुम्ही महागड्या किंवा लक्झरी भेटवस्तूंशिवाय तुमच्या जोडीदारावर प्रेम कसे व्यक्त करू शकता, हे या सीरिजमध्ये दाखवण्यात आलं आहे.

काय आहे ‘When Life Gives You Tangerines’ ची कथा?

When Life Gives You Tangerines on Netflix: या सीरिजमध्ये प्रेमाचा खरा अर्थ अतिशय सुंदर पद्धतीने दाखवण्यात आला आहे. कधी कधी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी मोठ्या गोष्टींची नव्हे तर छोट्या गोष्टींची गरज असते, असं या सीरिजमध्ये दाखवण्यात आलंय. याचा प्रत्येक भाग वेगवेगळ्या ऋतूंसह प्रेमाचा अर्थ स्पष्ट करतो. या सीरिजची पार्श्वभूमी १९५० ते २००० च्या दशकातील आहे. अभिनेता किम वॉन सीओकने प्रत्येक सीन इतक्या उत्तम पद्धतीने केला आहे की तुम्ही पडद्यावरुन नजर हटवू शकणार नाही. सीरिजमध्ये Ae-sin नावाची एक मुलगी आहे, जी कविता लिहिते. तिच्या आयुष्यात ग्वान सिक नावाचा एक मुलगा आहे, जो लहानपणापासून तिच्यावर प्रेम करतो आणि तिच्याशी लग्न करण्याचे स्वप्न पाहतो.

सीरिजला मिळाले सर्वाधिक रेटिंग

‘व्हेन लाइफ गिव्ह्स यू टेंगेरिन्स’ या के-ड्रामा सीरिजचे एकूण १६ एपिसोड आले आहेत. तुम्ही ही सीरिज नेटफ्लिक्सवर पाहू शकता. या सीरिजने रेटिंगचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत, यावरून तुम्हाला या सीरिजच्या लोकप्रियतेचा अंदाज येईल. ‘लव्हली रनर’, ‘स्क्विड गेम’ आणि ‘क्वीन ऑफ टियर्स’ यांना अनुक्रमे ८.६, ८.५ आणि ८.२ रेटिंग मिळाले आहेत, तर या सीरिजला ९.३ रेटिंग मिळाले आहे. त्यामुळे जर तुम्ही हा के-ड्रामा अजून पाहिला नसेल तर नक्की पाहा.