सध्या बॉलिवूडमध्ये देशभक्तीपर चित्रपटांचा ट्रेंड आहे. या चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने यांच्या निर्मितीचे प्रमाण वाढले आहे. ऐतिहासिक घटना मोठ्या पडद्यावर उतरवण्याचा प्रयत्न सिनेसृष्टीतील निर्माते करत आहेत. या चित्रपटशैलीमधले गुप्तहेरांच्या जीवनावर आधारलेले चित्रपट खूप चालतात. ‘बेबी’, ‘राझी’, ‘नाम शबाना’ असे बरेचसे चित्रपट या श्रेणीमध्ये मोडतात. चित्रपटांकडून हा ट्रेंड ओटीटी विश्वामध्ये गेल्याचे पाहायला मिळते. ‘द फॅमिली मॅन’, ‘स्पेशल ऑप्स’ यांसारख्या वेब सीरिजना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. याच पठडीमधली ‘मुखबीर: द स्टोरी ऑफ अ स्पाय’ (Mukhbir: The Story of a Spy) ही वेब सीरिज पुढच्या महिन्यामध्ये प्रदर्शित होणार आहे.
झी 5 च्या या सीरिजमध्ये प्रकाश राज, आदिल हुसेन आणि झेन खान दुर्रानी हे कलाकार प्रमुख भूमिकेमध्ये आहेत. स्पेशल ऑप्सचे दिग्दर्शन करणाऱ्या शिवम नायर यांनी जयप्रद देसाई यांनी मिळून ही सीरिज दिग्दर्शित केली आहे. नुकताच सीरिजचा ट्रेलर सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. ट्रेलरवरुन ही सीरिजची पार्श्वभूमी १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या काळातली आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला भारताच्या हद्दीमध्ये पाकिस्तानचे टॅकर्स घुसखोरी करताना दिसतात आणि लगेच माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या कार्यालयातला पुढचा सीन सुरु होतो.
शास्त्रीजी तेथे उपस्थित असलेल्या एका अधिकाऱ्याला परिस्थितीची सविस्तर माहिती द्यायला सांगतात. तेव्हा तो अधिकारी पाकिस्तानमध्ये आपले गुप्तहेर नसल्याचे सांगतो. त्यानंतरच्या सीन्समध्ये सीरिजच्या नायकाची एन्ट्री होते. त्याचे पाकिस्तानमध्ये राहण्याकरिता आवश्यक असलेले प्रशिक्षणातली काही सीन्स दाखवण्यात आले आहेत. नायकामुळे १९६५ च्या युद्धामध्ये भारताला कसा फायदा होतो हे या सीरिजमध्ये दाखवले असल्याचा अंदाज ट्रेलर पाहिल्यानंतर लावला जात आहे. झेन खान दुरानीने या सीरिजमधल्या मुख्य नायकाचे पात्र साकारले आहे.
आणखी वाचा – ‘कांतारा’ अंधश्रद्धेला खतपाणी घालतो का? रिषभ शेट्टी म्हणाला, “मी त्याबद्दल…”
प्रकाश राज आणि आदिल हुसेन हे लष्करातील अधिकाऱ्यांच्या भूमिकेमध्ये दिसणार आहेत. त्यांच्यासह बरखा सेनगुप्ता, झोया अफरोज, हर्ष छाया, सत्यदीप मिश्रा आणि करण ओबेरॉय हे कलाकार या सीरिजमध्ये दिसणार आहेत. विक्टर टँगो एंटरटेनमेंटची निर्मिती असलेला ‘मुखबीर: द स्टोरी ऑफ अ स्पाय’ ही वेब सीरिज ११ नोव्हेंबर रोजी झी 5वर प्रदर्शित होणार आहे.