१९६५ मधील भारत पाकिस्तान युद्धाची पार्श्वभूमी, रिसर्च अँड अॅनालिसीस विंग म्हणजे ‘रॉ’ची सुरुवात, आणि या सगळ्या वातावरणात दोन्ही देशांमध्ये वाढणारी हेरगिरी यावर आधारित ‘झी ५’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर एक स्पाय थ्रिलर वेबसीरिज नुकतीच प्रदर्शित झाली आहे. हेरगिरीवर आधारित आपल्याकडे आजवर बऱ्याच कलाकृती झाल्या आहेत, पण ‘मुखबीर : द स्टोरी ऑफ स्पाय’ ही वेबसीरिज म्हणजे हेरगिरीवर बनलेली भारतातील उत्तम कलाकृती आहे असं म्हंटलं तरी अतिशयोक्ति ठरणार नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेर या शब्दाला उर्दूमध्ये ‘मुखबीर’ म्हणतात आणि याच हेरगिरी विश्वाभोवती या सीरिजचं कथानक फिरत राहतं. गेल्या काही दिवसांत तर या धाटणीचे कित्येक सीरिज आणि चित्रपट आले. अक्षय कुमारच्या ‘बेबी’पासून आलिया भट्टच्या ‘राजी’पर्यंत कित्येक चित्रपटात आपण हेरगिरी विश्वाबद्दल जाणून घेतलं आहे, पण तरी ही सीरिज या सगळ्यापेक्षा वरचढ ठरते ती तिच्या मांडणीमुळे. मुळात १९६५ च्या युद्धाबद्दल आजही वेगवेगळ्या गोष्टी आपल्या कानावर पडतात, पण त्या काळातील आंतरराष्ट्रीय डावपेच, देशातील राजकीय परिस्थिती आणि खासकरून पाकिस्तानचे मनसुबे हे सगळं कुठेही अतिरंजित न करता दाखवल्याने ही सीरिज या सगळ्या इतर चित्रपटांपेक्षा वरचढ ठरते.

आणखी वाचा : ‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशानंतर आमिर खानचा मोठा निर्णय; म्हणाला “पुढील दीड वर्षं तरी अभिनय…”

खासकरून आलिया भट्टच्या ‘राजी’ चित्रपटातून ज्यापद्धतीने आपल्याच गुप्तहेर संस्थेची प्रतिमा मलिन करायचा प्रयत्न झाला. या सीरिजमध्ये तसं न करता ‘रॉ’ची कार्यप्रणाली आणि तिचा उगम तसेच प्रवास हा योग्य पद्धतीने दाखवल्याने शंका काढायला जागा राहत नाही. गुप्तहेराशी निगडीत वेबसीरिज म्हणजे यात एक प्रेमकहाणी आलीच, पण या सीरिजमधील ही प्रेमकहाणी कथेशी अगदी सुसंगत वाटते आणि कोणताही बीभत्सपणा न दाखवता मूळ कथेचा महत्त्वाचा भाग म्हणूनच ती आपल्यासमोर सादर केली गेली आहे. बाकी खुर्चीला खिळवून ठेवणारा थरार, काळजाचे ठोके चुकवणारी काही दृश्यं आणि अनपेक्षित घटना आणि श्वास रोखून ठेवून बघायला लावणारा सस्पेन्स या सगळ्या गोष्टी या सीरिजमध्ये अगदी योग्य प्रमाणात बघायला मिळतात. कदाचित यामुळेच या वेबसीरिज एक परिपूर्ण स्पाय सीरिज म्हणता येईल.

जयप्रद देसाई, शिवम नायर, करण ओबेरॉय, अर्शद सैयड यांनी लिहिलेल्या वेगवान कथा आणि पटकथेमुळे ८ भागांची ही वेबसीरिज कुठेही कंटाळवाणी वाटत नाही. शिवाय सीरिजमधील पार्श्वसंगीत आणि काही गझला या अविस्मरणीय आहेत. हे संगीत वेबसीरिजच्या कथेत कुठेही बाधा आणत नाही हे विशेष. खासकरून शेवटचे २ भाग बघताना तुमची पापणी देखील लवणार नाही असा थरार आपल्याला बघायला मिळतो आणि शेवट बघताना आपण तितकेच भावूकही होतो. केवळ एका गुप्तहेरापुरती ही कथा मर्यादित न ठेवता दैनंदिन जीवनातील नातेसंबंधावरही ही सीरिज भाष्य करते. शिवाय १९६५ चा काळ आणि त्या काळातील भारत आणि पाकिस्तान अगदी हुबेहूब आपल्या समोर उभा केला आहे.

अभिनयाच्या बाबतीत सगळ्यांनीच लाजवाब कामगिरी केली आहे. प्रकाश राज, आदिल हुसेनसारखे कलाकार लाजवाब काम करतातच यात काहीच दुमत नाही, पण या सीरिजमधील इतरही कलाकारांची कामं वाखाण्याजोगी झाली आहेत. सत्यदिप मिश्राने साकारलेला ‘आलमगिर’पासून हर्ष छायासारख्या अभिनेत्याने साकारलेल्या ‘जनरल आगा खान’पर्यंत सगळ्यांची कामं चोख झाली आहेत. खासकरून हरफन बुखारी हे मुख्य पात्र साकारणारा झैन खान दुरानी याने साकारलेला ‘मुखबीर’ कायम तुमच्या स्मरणात राहील. त्याचा शांत स्वभाव, आकर्षक व्यक्तिमतत्त्व आणि त्यांची चपळाई आणि सीरिजच्या शेवटाकडे त्याला आलेलं नैराश्य या सगळ्या गोष्टी त्याने फारच उत्तमरित्या सादर केल्या आहेत. शिवाय बेगम अनार ही भूमिका साकाणाऱ्या बरखा बिश्त आणि जमीला ही भूमिका साकारणाऱ्या जोया अफरोजबरोबर झैनची केमिस्ट्री चांगलीच जमून आली आहे. १९६५ भारत पाकिस्तान युद्धाबद्दल बरेच गैरसमज असले तरी याच पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या ‘रॉ’च्या जन्माची कहाणी या सीरिजमधून अत्यंत उत्तमरित्या उलगडून दाखवण्यात आली आहे. भावनाविवश न होता केवळ देशाच्या सुरक्षेसाठी बलिदान देणाऱ्या अशा कित्येक गुप्तहेरांना ही सीरिज म्हणजे उत्तम मानवंदना आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zee5 original webseries mukhbir the story of a spy review starring prakash raj adil hussain avn