‘द आर्चीज’ या चित्रपटाकडे गेले अनेक दिवस सर्वांचं लक्ष लागलं आहे. या चित्रपटातून अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा, शाहरुख खानची लेक सुहाना खान आणि श्रीदेवी यांची धाकटी लेक खुशी कपूर बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहेत. आज या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. पण हा टीझर पाहून प्रेक्षक काहीसे नाखुश झाले आहेत.
या टीझरची सुरुवात रिव्हरडेल स्टेशनवर थांबलेल्या ट्रेनने होते. रिव्हरडेल स्टेशन हे भारतातील प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. चित्रपटाची कथा ६० च्या दशकातील प्रेम, मैत्री आणि दु:ख यावर आधारलेली आहे. चित्रपटाचे संपूर्ण कथानक प्रसिद्ध अमेरिकन कॉमिक ‘द आर्चीज’वर आधारित आहे. तर झोया अख्तरने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.
चित्रपटाचा हा टीझर सोशल मीडियावर येताच नेटकऱ्यांनी त्यावर कमेंट करत या चित्रपटाच्या कथेला आणि कास्टला नापसंती दर्शवायला सुरुवात केली. एकाने लिहिलं, “भारतातील ९९% लोक या चित्रपटाच्या कथेला रिलेट करणार नाहीत.” तर दुसऱ्याने म्हटलं, “तुम्ही हा काळ युरोपमधील दाखवत आहात की भारतातील? युरोपियन कपडे घातलेले भारतीय लोक तुम्ही दाखवत आहात. हा आणखी एक चित्रपट आहे ज्याची कास्ट आणि गाणी चांगली आहेत परंतु कथा अत्यंत वाईट आहे.” तर आणखी एकाने लिहिलं, “यापैकी कोणीही अभिनय करू शकेल किंवा डान्स करू शकेल असं वाटत नाही.” तर आणखी एक जण म्हणाला, “तर तुम्ही असं म्हणत आहात की ६०च्या दशकांत भारत हा युरोपपेक्षा प्रगत होता? हा खूप मोठा विनोद आहे.” तर दुसरा म्हणाला, “नेपोटिझम इफेक्ट.”
हेही वाचा : Video: “ही कोण…” सुहाना खानला मागे टाकत तिच्याबरोबरच्या ‘त्या’ व्यक्तीची चर्चा
झोया अख्तर दिग्दर्शित हा चित्रपट लवकरच ‘नेटफ्लिक्स’वर प्रदर्शित होईल. या चित्रपटात सुहाना खान, अगस्त्य नंदा, खुशी कपूर यांच्या व्यक्तिरिक्त डॉट, वेदांग रैना, मिहिर आहुजा आणि युवराज मेंडा हे कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.