चित्रपटसृष्टीत प्रदीर्घ अनुभव असलेलेआणि अभिनयाची शाळा म्हणून नावाजलेले दोन कलाकार जेव्हा एकत्र काम करतात तेव्हा काही वेगळीच अनुभूती प्रेक्षकांच्या मनात उमटते. सुनील सुकथनकर दिग्दर्शित ‘आऊटहाऊस’ या हिंदी चित्रपटात अभिनेत्री शर्मिला टागोर आणि अभिनेते मोहन आगाशे या दोन प्रतिभावान कलाकारांना एकत्र घेऊन केलेली अत्यंत साधी-सोज्वळ आणि सुंदर कथा पाहायला मिळते. कुठल्यातरी कामात मग्न असावं आणि मनात हळुवार गाण्याची सुरेल लकेर रुंजी घालत असावी असा काहीसा अनुभव हा चित्रपट पाहताना येतो.
‘आऊटहाऊस’ या चित्रपटाची ठोस अशी कथा सांगता येणार नाही. म्हटलं तर एका गमतीशीर घटनेभोवती गुंफलेली कथा आहे. आपापल्या वकुबाप्रमाणे घरसंसार करून झालेली, जबाबदाऱ्यांतून मुक्त झालेली, कामातून निवृत्ती घेतलेली, आयुष्याचं सांजपर्व आपल्या मनाप्रमाणे जगू पाहणारी अनेक वयस्कर मंडळी आपल्या आजूबाजूला असतात. कोणाची मुलं त्यांच्यापासून दूर वेगळ्या शहरात राहत आहेत. तर कोणाची मुलं सतत येऊन जाऊन आई-वडिलांची देखभाल करत असतात. तरीही सगळ्यात असून काही वेळा ही जुनीजाणती मंडळी जाणीवपूर्वक एकटं राहणं पसंत करतात.
हेही वाचा >>>Video : “अमोल म्हणजे आमचा जीव…”, एकीकडे अप्पी-अर्जुन लग्नबंधनात अडकणार अन् दुसरीकडे अमोलची साथ सुटणार? पाहा प्रोमो
‘आऊटहाऊस’ या चित्रपटात मी माझ्या मनाचा राजा आहे, म्हणत आपल्या मस्तीत आयुष्य जगू पाहणाऱ्या नाना मोडक (मोहन आगाशे) यांची गोष्ट पाहायला मिळते. गुप्तहेरांच्या कथा, अॅक्शनपट किंवा गेम्स खेळण्यात नाना रमतात. ते शिस्तीचेही भोक्ते आहेत. नाना एकटे राहात असले तरी त्यांना हा एकटेपणा पुरता छळणारा नाही. एकीकडे नानांची गोष्ट आहे, तर दुसरीकडे शर्मिला टागोर यांनी साकारलेल्या आदिमाँची गोष्ट आहे. त्या स्वत: कथाचित्रकार आहेत. त्यांचा नातू नील त्यांच्याकडे राहायला आला आहे. नीलच्या आई-वडिलांच्या नात्याचीही छोटी गोष्ट आहे या चित्रपटात… त्या ओघात दिग्दर्शकाने पालकांचे नातेसंबंध आणि त्यांचा मुलांवर होणारा परिणाम या दोन गोष्टींचा परस्परसंबंध या नात्याने आणि स्वतंत्रपणेही भाष्य केलं आहे. मात्र ती चित्रपटाची मुख्य गोष्ट नाही. तर नीलबरोबर त्याचा छोटा श्वान दोस्त पाब्लोही आदिमाँकडे आला आहे. त्यांना कुत्रा आवडत नाही, त्यामुळे त्या पाब्लोला घराबाहेर बांधून ठेवतात. दुसऱ्या दिवशी सकाळी पाब्लो गायब होतो आणि नील घर डोक्यावर घेतो. आदिमाँ आणि नील पाब्लोला शोधण्यासाठी योजना आखतात. इथे नीलचा एकटेपणातला साथी हरवतो. तर दुसरीकडे एकट्या असलेल्या नानांच्या आयुष्यात असाच एक छोटा कुत्रा येतो आणि नानांची त्याच्याशी घट्ट मैत्री होते. आता या दोन घटनांमधला नेमका संबंध काय? नानांच्या गोष्टीचं पुढे काय होतं? माँ आणि नील यांची पाब्लोच्या शोधाची मोहीम फत्ते होते का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं चित्रपट पाहून मिळवण्यातच खरा आनंद आहे.
हेही वाचा >>>Video: सुंदर सजावट अन् फुलांची उधळण; रेश्मा शिंदेने शेअर केला हळदीचा व्हिडीओ
दिग्दर्शक सुनील सुकथनकर आणि सुमित्रा भावे या जोडगोळीने आजवर उत्तम चित्रपट दिले आहेत. दिवंगत लेखिका-दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांच्या कथेवर आधारित ‘आऊटहाऊस’ हा चित्रपट सुनील सुकथनकर यांनी दिग्दर्शित केला आहे.
कुठलंही उथळ वा भडक नाट्य नसलेली, नको ती वळणं, नको तेवढी रंजकता असे सगळे फाटे न फोडता साधीसरळ कथा मांडणी हे या चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे. काहीशी जुन्या पद्धतीच्या चित्रपटांप्रमाणे जाणारी मांडणी आहे. वास्तवदर्शी चित्रण ही सुकथनकर यांची शैली याही चित्रपटात आहे, पण साधासाच प्रसंग वा घटनेची रसाळ, ओघवती मांडणी यामुळे चित्रपट सुंदर वाटतो. चित्रांचाही फार छान वापर गोष्ट पुढे नेताना करून घेतला आहे. शिवाय, अनमोल भावे यांनी दिलेल्या सुरेल पार्श्वसंगीताची जोडही चित्रपटाला मिळाली आहे. या सगळ्याचा फार परिणामकारक वापर चित्रपटात करून घेतला आहे.
अभिनेत्री शर्मिला टागोर फार मोजक्या चित्रपटांतून काम करताना दिसतात. या चित्रपटात त्यांना आदिमाँच्या भूमिकेत पाहणं ही पर्वणी आहे. अर्थात, या चित्रपटाचा बराचसा भार हा अभिनेते मोहन आगाशे यांनी साकारलेल्या नाना मोडक या व्यक्तिरेखेवर आहे. वरवर विक्षिप्त वाटणारे, पण बरेचसे खोडकर आणि खेळकर नाना पाहताना मजा येते. त्यांचा छोटा दोस्त हरवल्यावर अस्वस्थ, खऱ्या अर्थाने एकाकी झाल्यासारखे भासणारे नाना आणि त्याची भेट झाल्यानंतर, परिस्थितीचा स्वीकार करणारे नाना असे या व्यक्तिरेखेचे मजेशीर पैलू मोहन आगाशे यांनी लीलया साकारले आहेत. मुळात आपल्याही आयुष्यात अशा साध्या-साध्या घटना घडतातच. त्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन फार महत्त्वाचा ठरतो. सुकथनकरांनी आपल्या मांडणीतून दोन पिढ्यांमधील या मतभेदांकडे पाहण्याचा, ते दूर सारून एकत्र येण्याच्या त्यांच्या प्रयत्नांकडे लक्ष वेधलं आहे. त्यामुळे हलकीफुलकी मांडणी असलेला आणि उत्तम कलाकारांच्या सहजअभिनयाने नटलेला ‘आऊटहाऊस’ सध्याच्या ठरावीक साच्यात अडकलेल्या चित्रपटांच्या गर्दीत वेगळा ठरतो.
आऊटहाऊस
दिग्दर्शक : सुनील सुकथनकर
कलाकार : शर्मिला टागोर, मोहन आगाशे, सुनील अभ्यंकर, सोनाली कुलकर्णी, नीरज काबी.