महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेल्या पु.ल देशपांडे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळविलेले नाटक म्हणजे ‘ती फुलराणी’. पु.ल. यांच्या ‘ती फुलराणी’तील ‘फुलराणी’ काळानुरूप बदलत गेली. भक्ती बर्वे, प्रिया तेंडुलकर, सुकन्या कुलकर्णी आणि अमृता सुभाष अशा चौघींनी ‘फुलराणी’ उभी केली. या सगळ्यांनी फुलराणी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली, अशावेळी नवा चेहऱ्यासहित ‘ती फुलराणी’ हे नाटक नव्या रुपात आणि नव्या संचात घेऊन आणण्याचं शिवधनुष्य लेखक नाट्यदिग्दर्शक राजेश देशपांडे यांनी उचललं आहे. ‘अष्टगंध एंटरटेण्मेंट निर्मित’ ‘एँडोनिस एण्टरप्रायजेस’ प्रकाशित ‘ती फुलराणी’ हे नाटक नव्या बाजात लवकरच रंगभूमीवर येत आहे. धनंजय चाळके याचे निर्माते आहेत.
हे नाटक माझ्यासाठी एक वेगळा अनुभव आहे. असं सांगत रसिकांना पुर्नप्रत्ययाचा आनंद देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असल्याची भावना राजेश देशपांडे यांनी बोलून दाखवली. या नाटकाच्या संहितेमध्ये कोणताही बदल करण्यात आला नसून तांत्रिक बाबतीत थोडे बदल करण्यात आल्याची माहिती राजेश देशपांडे यांनी दिली.
आधीच्या अभिनेत्रींनी ही भूमिका इतकी सुंदर वठवल्यानंतर ही भूमिका नव्या अभिनेत्रीसाठी आव्हानच होतं. अभिनेत्री हेमांगी कवी ही नवी फुलराणी साकारणार असून ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ असं ठसक्यात म्हणत रसिकांची उत्कंठा वाढवायला सज्ज झाली आहे. फुलराणीच्या भूमिकेतील हेमांगी कवी सोबत प्राध्यापकांच्या भूमिकेत डॉ गिरीश ओक आहेत. सोबत मीनाक्षी जोशी, रसिका धामणकर, नितीन नारकर, प्रांजल दामले, विजय पटवर्धन, निरंजन जावीर, हरीश तांदळे, दिशा दानडे, सुनील जाधव, अंजली मायदेव, हे कलाकारही यात आहेत. सूत्रधार नितीन नाईक आहेत.
‘तिन्ही सांजा’ व ‘स्पिरीट’ या नाटकांचं सध्या गाजत असलेलं नेपथ्य करणारे संदेश बेंद्रे यांनी ‘ती फुलराणी’ या नाटकाचं नेपथ्य केलं आहे. ‘लोकमान्य’साठी सर्वोत्कृष्ट वेशभूषेचा झी चा विशेष पुरस्कार पटकावणाऱ्या महेश शेरला यांनी वेशभूषेची जबाबदारी सांभाळली असून रंगभूषा उदय तांगडी यांची आहे. एक ‘पोरगी नाक्यावरती’ फेम निषाद गोलांबरे यांचं संगीत या नाटकाला लाभलं आहे. प्रकाशयोजना भूषण देसाई यांनी सांभाळली आहे.
‘फुलराणी’ परत येतेय
पु.ल. यांच्या ‘ती फुलराणी’तील ‘फुलराणी’ काळानुरूप बदलत गेली
Written by लोकसत्ता टीमguravchaitali
First published on: 07-03-2016 at 12:15 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: P l deshpandes ti phulrani drama returning on stage