बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत, करण जोहर, एकता कपूरसोबत गायक अदनान सामीला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा देशातील चौथा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. या सर्व कलाकारांच्या कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. यावेळी तब्बल ११९ जणांना पद्म पुरस्कार मिळाला. नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात हा पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्याला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते.
या पुरस्कार सोहळ्यात विविध क्षेत्रात योगदान दिलेल्या विविध व्यक्तींचा गौरव करण्यात आला. गेल्यावर्षी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पद्मश्री पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. यावेळी कंगना रणौत, अदनान सामी, करण जोहर आणि एकता कपूर यांच्या नावाची पद्मश्री या प्रतिष्ठेच्या सन्मानासाठी घोषणा करण्यात आली होती.
भारतरत्न, पद्मविभूषण आणि पद्मभूषण यांच्यानंतर पद्मश्री हा भारतातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. यंदा तब्बल १० जणांना पद्मभूषण पुरस्कार, १०२ व्यक्तींना पद्मश्री आणि सात जणांना पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या सर्व कलाकारांचा पुरस्कार देऊन गौरव केला. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित होते.
यावेळी कंगना रणौतला तिच्या चित्रपटातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी कंगनासोबत तिची बहिण रंगोली देखील उपस्थित होते. तर अदनान सामीला कला आणि संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल या सर्वोच्च सन्मानाने गौरवण्यात आले. तर प्रसिद्ध अभिनेत्री सरिता जोशी यांना कला आणि नाटक क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. तर प्रसिद्ध दिवंगत गायक बालासुब्रमण्यम यांना मरणोत्तर पद्मविभूषण देण्यात आला आहे.