नशिब कधी आणि कसं वळण घेईल हे काही सांगता येत नाही असच म्हणावं लागेल. याचा प्रत्यय सध्या अभिनेता रणवीर सिंगला आला असावा. चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर अवघ्या काही वर्षांमध्ये रणवीरने स्वत:चं असं भक्कम स्थान निर्माण केलं. तगड्या कलाकारांच्या गर्दीतही त्याने आपल्या अभिनयाने चाहता वर्ग निर्माण केला. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘पद्मावत’ या चित्रपटाने तर रणवीरच्या कारकिर्दीला एक वेगळीच कलाटणी दिली. पण, या यशाने हुरळून न जाता रणवीर पुन्हा एकदा त्याच्या आगामी चित्रपटाच्या कामात व्यग्र झाला आहे.

झोया अख्तरच्या ‘गल्ली बॉय’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी रणवीर जास्तीत जास्त वेळ देत असून, या चित्रपटासाठी त्याने एका कार्यक्रमात जाण्यास नकार दिला आहे. एका लग्नात अर्ध्या तास उपस्थित राहण्यासाठी रणवीरला २ कोटी रुपये देण्यात येणार होते. पण, ‘गल्ली बॉय’मुळे त्याने हा प्रस्ताव नाकारला.

वाचा : अखेर दीपिकाने केला खुलासा, ‘पद्मावत’मधील हे दृश्य साकारताना तिचेही डोळे पाणावले

‘डीएनए’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार कोणत्याही चित्रपटाच्या बाबतीत काही गोष्टींवर रणवीर जास्त लक्ष देतो. कामाच्या बाबतीत तो हलगर्जीपणा करत नाही. त्या लग्नाला जाण्यासाठी त्याला चित्रीकरणातून वेळ काढावा लागणार होता. त्याशिवाय विमान प्रवास करत दुसऱ्या शहरात जाऊन त्याच दिवशी त्याने चित्रपटाच्या सेटवर परत येणं अपेक्षित होतं. या साऱ्यामध्ये त्याला आराम करण्यासाठी वेळच मिळणार नव्हता. त्यामुळे त्याने लग्नाला जाणं टाळलं.

VIDEO : ‘लल्लाटी भंडार’वर खिल्जी थिरकतो तेव्हा

रणवीरने त्याच्या टीमला सांगून आपल्याला त्या लग्नाला हजेरी लावण्यापेक्षा चित्रपटावर लक्ष केंद्रित करणं जास्त आवडेल असा निरोप पाठवत पैशांऐवजी आपल्या कामाला प्राधान्य दिलं. सेलिब्रिटी सहसा विविध कार्यक्रमांना हजेरी लावतात ज्यासाठी त्यांना घसघशीत रक्कमही मिळते. पण, कामाचा वाढता व्याप आणि आपली जबाबदारी या गोष्टी जाणतच रणवीरने हा निर्णय घेतला असल्याचं कळत आहे.

Story img Loader