कमी वयामध्ये फिल्म फेअर पुरस्काराची मानकरी ठरणारी अभिनेत्री म्हणजे पद्मिनी कोल्हापूर. ८०-९० च्या दशकामध्ये हिंदी चित्रपटसृष्टीत नावाजलेल्या अभिनेत्रींपैकी एक असलेल्या पद्मिनी कोल्हापूरे यांचा आजपर्यंतचा प्रवास समृद्ध आणि बहारदार करणारा आहे.हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या पद्मिनी कोल्हापूरे आता तब्बल १४ वर्षानंतर पुन्हा एकदा मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करणार आहेत.
‘इन्साफ का तराजू’साठी १९८१ साली सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री तर ‘प्रेम रोग’ साठी १९८३ साली सर्वोत्कृष्ट नायिकेचा पुरस्कार पटकावणाऱ्या पद्मिनी यांनी ‘चिमणी पाखरं’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. या चित्रपटासाठी त्यांना विविध पुरस्काराने सन्मानितही करण्यात आलं. त्यानंतर आता ‘प्रवास’ या चित्रपटाच्या माध्यमातून त्या पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. शशांक उदापूरकर दिग्दर्शित ‘प्रवास’ या मराठी चित्रपटात त्या प्रमुख भूमिका साकारणार असून आशुतोष गोवारीकर यांच्या महत्वाकांक्षी ‘पानिपत’ या हिंदी चित्रपटातही त्या झळकणार आहेत.
व्यक्तिरेखेच्या अंतरंगात शिरून सहज ताबा घेणे हीच खरी पद्मिनी कोल्हापुरेंची खासियत आहे. असाच सखोल अनुभव पुन्हा मराठी रसिकांना पहायला मिळणार आहे. त्यांची प्रमुख भूमिका असलेला ‘प्रवास’ या आगामी चित्रपटाचं त्या एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये त्यांच्यासोबत अभिनेता अशोक सराफ पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहेत.
दरम्यान, पद्मिनी कोल्हापुरे यांनी ‘एक खिलाडी बावन पत्ते’ या चित्रपटातून बालकलाकार म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले त्यानंतर ‘इश्क इश्क इश्क’, ‘जिंदगी’, ‘ड्रीम गर्ल’, ‘साजन बिन सुहागन’, ‘सत्यम शिवम सुन्दरम’, ‘इंसाफ का तराजू’, ‘आहिस्ता आहिस्ता’, ‘ज़माने को दिखाना है’, ‘प्रेम रोग’, ‘विधाता’, ‘सौतन’, ‘लवर्स’, ‘वो सात दिन’, ‘प्यार झुकता नहीं’, ‘प्यार किया है प्यार करेंगे’, ‘दाता’, ‘स्टार’, ‘मजदूर’, ‘यह इश्क नही आसान’, ‘सड़क छाप’, ‘आग का दरिया’, ‘हम इंतजार करेंगे’, ‘हवालात’, ‘प्यार के काबील’, ‘किरयादार’, ‘प्रीती’, ‘सुहागन’, ‘मुद्दत’, ‘स्वर्ग से सुंदर’, ‘बेवफाई’, ‘अनुभव’, ‘नया कदम’, ‘नयी पहेली’, ‘प्रोफेसर कि पडोसन’, ‘माई’, ‘फटा पोस्टर निकला हीरो’ अश्या जवळपास शेकडो हिंदी चित्रपटांमध्ये साकारलेल्या प्रमुख नायिका कायम रसिकांच्या मनावर कोरल्या गेल्या आहेत.
राज कपूर, शशी कपूर, ऋषी कपूर, राजेश खन्ना, जितेंद्र, मिथुन चक्रवर्ती, अनिल कपूर, संजय दत्त, जॉकी श्रॉफ, राज बब्बर, कुमार गौरव ते शाहीद कपूरपर्यंतचा हा प्रवास खरंच अथांगच म्हणावा लागेल. त्यांनी ग्लॅमरस, सोशिक, वात्सल्यासोबत विविध जातकुळीच्या भूमिका जिवंत केल्या आहेत. त्यांनी पठडीबाज अभिनय कधी केला नाही. सतत चौकट मोडून वेगळ्या भूमिका केल्या.
हिंदी चित्रपटांमध्ये व्यस्त असतानाही त्यांनी त्यांचे पती प्रदीप (टूटू) शर्मा यांच्या मदतीने हिंदी, मराठीसह इतर भाषांमधील चित्रपटांची निर्मिती चालूच ठेवली आहे. ‘खुबसुरत’, ‘वन नाईट स्टँड’, ‘श्री सिंघ / श्रीमती मेहता’, ‘तेरा क्या होगा जॉनी’, ‘रॉकफोर्ड’, ‘राजकुमार’, ‘घरवाली बाहरवाली’, ‘नीयत’, ‘मर मिटेंगे’, ‘पाँच’, ‘अमीरी गरीबी’, ‘खुल्लम खुला प्यार करेंगे’, ‘महाराजा’, ‘ऐसा प्यार कहा’, ‘जख्मी शेर’, ‘मेहंदी रंग लाएगी’, ‘आकाश गोपुरम’ इत्यादी चित्रपटांसोबत त्यांनी दूरदर्शनसाठी ‘अथांग’ या मराठी मालिकेची निर्मिती केली आहे. तसेच ‘भुताचा भाऊ’, ‘लाठी’, ‘चीटर’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे.