भारतीय चित्रपटसृष्टीतील ८०चे दशक गाजवणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे पद्मिनी कोल्हापुरे आहेत. त्यांनी फक्त मराठीच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. त्याकाळात त्यांना इतक्या चित्रपटांची ऑफर मिळायची की त्यांच्याकडे प्रत्येक चित्रपट करण्यासाठी वेळ नव्हता. त्यामुळे त्यांनी अनेक चित्रपटांना नकार दिला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटाला देखील नकार दिल्याचे त्यांनी सांगितले.
स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार, पद्मिनी कोल्हापुरे यांच्या या वक्तव्यामुळे दिग्दर्शक राज कपूर यांच्यावर प्रश्न चिन्ह उभा राहिला आहे. मंदकिनी यांनी ४५ दिवस ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटाचे चित्रीकरण केल्या नंतर जर राज कपूर पद्मिनीकडे गेले, तर याचा अर्थ गंगा नावाच्या भूमिकेसाठी मंदाकिनी त्यांना योग्य वाटत नव्हत्या.
या चित्रपटात मंदाकिनीसोबत अभिनेता राजीव कपूर यांनी मुख्य भूमिका साकारली होती. राज कपूर यांनी पद्मिनी कोल्हापुरे यांची निवड केली होती. मात्र, त्या चित्रपटातील चुंबनदृश्य जास्त असल्याने त्यांनी चित्रपटाला नकार दिला. शेवटी मंदाकिनी यांनीच या चित्रपटात गंगाची भूमिका साकारली. गंगा या भूमिकेमुळे मंदाकिनी रातोरात सुपरस्टार झाल्या. या चित्रपटातून त्यांनी प्रत्येकाची मने जिंकली.
पद्मिनी यांनी अनेक मोठ्या-मोठ्या चित्रपटांना नकार दिला होता. ‘एक दुजे के लिये’मधील रती अग्निहोत्री, ‘सिलसिला’मधील रेखा आणि ‘तोहफा’मधील श्रीदेवी यांनी साकारलेल्या भूमिका मला ऑफर झाल्या होत्या असं त्या अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या. शिवाय ‘राम तेरी गंगा मैली’ हा चित्रपट सोडल्याचं वाईटही वाटत होतं असंही त्यांनी मान्य केलं होतं.