Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम भागात मंगळवार, २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अवघा देश हादरला आहे. पहलगाममधील या घटनेचे अनेक हृदयद्रावक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियाद्वारे समोर येत आहेत. या घटनेमुळे लोक संतप्त झाले आहेत आणि सरकारने याचा बदला घेण्याची मागणी करत आहेत. या हल्ल्याचा भारतासह जगभरातून निषेध केला जात आहे. कलाक्षेत्रातूनही या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. अशातच लोकगायिका नेहा सिंह राठोडने काही दिवसांपुर्वी या हल्ल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती.

या टीकेबद्दल आता लोकगायिकेवर गाझियाबादचे लोणीचे आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शिवाय त्यांनी नेहाविरुद्ध तक्रारही दाखल केली आहे. किशोर गुर्जर यांनी त्यांच्या सोशल मीडियावर द्विट केले, यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की, “सीमेवरील दहशतवादी आणि शत्रू देशांना नष्ट करण्यासाठी आपले सैन्य पुरेसे आहे. पण सीमेवरील देशविरोधी शक्तींविरुद्ध स्वच्छता मोहीम राबवण्यासाठी आपण सर्वांना उभे राहावे लागेल.”

यापुढे त्यांनी नेहावर टीका करत असं म्हटलं आहे की, “देशाविरुद्ध सुनियोजित प्रचार, पाकिस्तानबद्दल सहानुभूती निर्माण करणे आणि निष्पाप लोकांच्या क्रूर हत्येसाठी देशाच्या सुरक्षा दलांना दोष फक्त आयएसआय एजंट आणि टीआरएफ या दहशतवादी संघटनेचे सदस्यच देऊ शकतात. त्यामुळे याची सखोल चौकशी करून तात्काळ अटक करावी. राजकीय विरोध ठीक आहे; पण देशविरोधी असं वक्तव्य करणं हा अक्षम्य गुन्हा आहे. जर ती दुसऱ्या कोणत्या देशात असती तर आतापर्यंत तिला अटक करून फाशी देण्यात आली असती.”

याशिवाय ते व्हिडीओमध्ये असं म्हणाले की, “नेहा सिंह ज्याप्रकारचं वक्तव्य करत आहे आणि बोलताना ती ज्या प्रकारच्या भाषेचा वापर करत आहे त्यावरून कळत आहे की, ती आयएसआयची एजंट आहे. ती भारतातील एक आतंकवादीच आहे. ती त्यांच्यासाठी काम करते. त्यामुळे तिची कठोर चौकशी व्हावी आणि तिला काठोरातली कठोर शिक्षा व्हावी. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सगळे भारतीय दु:खी असताना ती अनेक प्रक्षोभक वक्तव्य करत आहे. त्यामुळे तिच्यावर फास्ट टॅग कोर्टात खटला चालला पाहिजे. तिचं हे वक्तव्य म्हणजे राष्ट्रद्रोह आहे.”

दरम्यान, हल्ल्यानंतर नेहाने व्हिडीओ शेअर करत “नोटबंदी करून तुम्ही दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले होते. मग हे कसे घडले? किती काळ देश तुमच्या वक्तृत्वाने चालवणार? की या हल्ल्यालाही आता नेहरूजी जबाबदार आहेत? तुम्ही कोणतीही पत्रकार परिषद घेणार नाही आणि कोणतीही जबाबदारी घेणार नाही. संपूर्ण देशाला हे आधीच माहित आहे. पण, मी तुम्हाला प्रश्न विचारेन” असं म्हणत टीका केली होती. त्यामुळे याबद्दल तिच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी केली आहे.