Pahalgam Terrorist Attack : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम भागात मंगळवारी (२२ एप्रिल) दुपारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अवघा देश हादरला आहे. या दहशतवादी हल्ल्यात आत्तापर्यंत २६ पर्यंटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय अनेक पर्यटक गंभीर जखमी झाले आहेत. पहलगाममधील या घटनेचे अनेक हृदयद्रावक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियाद्वारे समोर येत आहेत. या घटनेमुळे लोक संतप्त झाले आहेत आणि सरकारने याचा बदला घेण्याची मागणी करत आहेत.
पहलगाम हल्ल्याबद्दल गायिका नेहा सिंग राठोडची मोदी सरकारवर टीका
या हल्ल्याचा भारतासह जगभरातून निषेध केला जात आहे. कलाक्षेत्रातूनही या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. अशातच लोक गायिका नेहा सिंह राठोडने या घटनेवरुन मोदी सरकारला घेरले आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावरून नेहाने मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. हल्ल्यासंदर्भात तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. नेहाने एक्स (पुर्वीचे ट्विटर)वर एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि मोदी सरकारवर टीका करत काही प्रश्नही उपाठीत केले आहेत.
“नोटबंदी करून तुम्ही दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले होते. मग हे कसे घडले?”
या व्हिडीओमध्ये तिने असं म्हटलं आहे की, “काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला आणि त्यात पर्यटकांचा मृत्यू झाला. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो. नोटबंदी करून तुम्ही दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले होते. मग हे कसे घडले? किती काळ देश वक्तृत्वाने चालवणार? की या हल्ल्यालाही आता नेहरूजी जबाबदार आहेत का? कोणताही पत्रकार तुम्हाला प्रश्न विचारणार नाही. तुम्ही कोणतीही पत्रकार परिषद घेणार नाही आणि कोणतीही जबाबदारी घेणार नाही. संपूर्ण देशाला हे आधीच माहित आहे. पण, मी तुम्हाला प्रश्न विचारेन”.
जम्मू कश्मीर के पहलगाम में आतंकी हमला हुआ और पर्यटकों की हत्या कर दी गई.
— Neha Singh Rathore (@nehafolksinger) April 22, 2025
ईश्वर उनकी आत्मा को शांति दे…?
कश्मीर की शांति आतंकवादियों की मेहरबानी पर टिकी है क्या मोदीजी?@narendramodi #PahalgamAttack #Pahalgam #PahalgamTerroristAttack pic.twitter.com/6slOgAlFEe
“देशवासियांचे मृतदेह गोळा करण्याचे काम किती काळ सुरू राहणार?”
यापुढे तिने प्रश्न विचारत म्हटलं आहे की, “तुमच्या छप्पन इंच छातीचा आणि लाल डोळ्यांचा काय उपयोग? सर्जिकल स्ट्राईक खरोखरच एक कथा होती का? कलम ३७० वर मोठ्या गप्पा मारून काय उपयोग? पुलवामा हल्ल्यात जवान शहीद झाले. पहलगाम हल्ल्यात पर्यटकांचा मृत्यू झाला. मोदीजी… मला सांगा, काश्मीरचे स्वातंत्र्य दहशतवाद्यांच्या दयेवर अवलंबून आहे का? मोदीजी, कृपया उत्तर द्या. काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या नावाखाली मते मिळवण्याचे आणि देशवासीयांचे मृतदेह गोळा करण्याचे काम किती काळ सुरू राहणार?”

“तुमच्या चुकांसाठी देशवासियांनी त्यांच्या प्राणांचे बलिदान द्यायचे का?”
यानंतर नेहाने या व्हिडीओत असं म्हटलं आहे की, “तुम्ही पंतप्रधान झाल्यापासून देशात लाखो लोक मृत्युमुखी पडले आहेत. कधी ऑक्सीजन कमी पडला म्हणून… कधी वॅक्सिनमुळे… कधी रेल्वे दुर्घटनांमुळे… तर कधी पूल पडल्यामुळे… पण तुम्ही कधीही कोणतीही जबाबदारी घेतली नाही. देशवासीयांच्या मृत्यूची जबाबदारी तुम्ही कधी घेणार? तुमच्या चुका तुम्ही कधी मान्य करणार? उत्तर द्या मोदीजी… तुमच्या चुकांसाठी देशवासीयांनी त्यांच्या प्राणांचे बलिदान द्यायचे का? मोदीजी किती काळ शांत राहणार?”