पाकिस्तानच्या खैबर-पख्तुनख्वा प्रांतीय सरकार फाळणीपूर्वी बांधलेले २५ बंगले खरेदी करणार असल्याची माहिती आहे. यामध्ये बॉलिवूड अभिनेते राज कपूर आणि दिलीप कुमार यांची पाकिस्तानमधील पिढीजात घरंसुद्धा आहेत. या घरांना राष्ट्रीय वारसा वास्तूंचा दर्जा देण्यात आला आहे.
राज कपूर यांची पिढीजात ‘कपूर हवेली’ किस्सा ख्वानी बाजारमध्ये आहे. हा बंगला १९१८ ते १९२२ सालादरम्यान राज कपूर यांचे आजोबा दीवान बश्वेश्वरनाथ कपूर यांनी बांधला होता. राज कपूर आणि त्यांचे काका त्रिलोक कपूर यांचा जन्म याच बंगल्यात झाला होता. पाकिस्तानच्या प्रांतीय सरकारने याला राष्ट्रीय वारसा वास्तूचा दर्जा दिला आहे.
राज कपूर यांचे आजोबा दीवान बश्वेश्वरनाथ कपूर हे पोलीस उपनिरीक्षक होते. त्यांची बदली पेशावर येथे झाल्याने कपूर खानदान या शहरात राहायला आले. पेशावरमधील किस्सा ख्वानी बाजार परिसरातील डाकी नालबंदी भागात कपूर खानदानाचे पिढीजात घर आहे. राज कपूर यांचे वडील पृथ्वीराज कपूर यांची पावले नाट्य व चित्रपटसृष्टीकडे वळली. १९२८ मध्ये ते मायानगरी मुंबईत आले आणि मग कायमचे इथलेच झाले. राज कपूर यांचा जन्म पेशावरमध्येच झाला. त्यानंतर चारच वर्षांनी पृथ्वीराज कपूर मुंबईला नशीब आजमावण्यासाठी मुंबईला रवाना झाले. त्यानंतर त्यांच्या पत्नीदेखील १९३० मध्ये मुलाबाळांसह मुंबईत आल्या. कालांतराने पेशावरशी कपूर घराण्याचा संबंध हळूहळू विरळ होत गेला. फाळणीनंतर तर तो संपूर्णच तुटला. पेशावरमधील कपूर घराण्याचे पिढीजात घर भारताच्या फाळणीनंतर त्यांच्या मालकीचे राहणे शक्यच नव्हते. त्यामुळे ते राष्ट्रीय वारसा वास्तू म्हणून घोषित करण्यात आले.
दिलीप कुमार यांच्या पेशावरमधील पिढीजात घरालाही राष्ट्रीय वारसा वास्तूचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. दिलीप कुमार हेदेखील मूळचे पेशावरचेच. या शहरातील किस्सा ख्वानी बाजारातील मोहल्ला खुदादाद येथील निवासस्थानी त्यांचा जन्म झाला. १९२०च्या दशकाच्या अखेरीस दिलीप कुमार यांचे कुटुंबीय मुंबईला आले व इथेच स्थायिक झाले.