‘फवाद खान’ हे नाव घेतलं की सध्या बॉलीवूड कलाकारांमध्ये आणि पाकिस्तानी कलाकारांमध्ये कौतुकाला उधाण येतं. सर्वसामान्य प्रेक्षकांनाही फवाद हे नाव खूप परिचित झालं आहे ते ‘जिंदगी’ ही नवी वाहिनी आणि त्यावर लोकप्रिय असलेल्या ‘जिंदगी गुलजार है’ या मालिकेमुळे. फवादला पाकिस्तानी टेलीव्हिजन विश्वाचा अनभिषिक्त सम्राट म्हटलं तर वावगं ठरणार नाही इतका तो तिथे लोकप्रिय आहे. आणि इथे खरंतर तो
पाकिस्तानी कलाकारांची एक लाटच आली आहे की काय.. असं वाटावं इतके कलाकार, त्यांच्या मुलाखती, त्यांच्या मालिका आणि त्यांचे बॉलीवूडमधले चित्रपट असा माहौल सगळीकडे आहे. पाकिस्तानी अभिनेत्री हुमाईमा खान ही राजा नटवरलाल चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करते आहे, तर इम्रान अब्बास नक्वी हा पाकिस्तानी टीव्ही कलाकार ‘क्रिएचर थ्रीडी’ या चित्रपटातून बॉलीवूड प्रवेश करतो आहे. याशिवाय, ‘जिंदगी’ वाहिनीवरील अनेक पाकिस्तानी कलाकार जे चर्चेत आहेत ते सगळेजण फवादची बॉलीवूड एन्ट्री ही फार महत्त्वाची आणि अभिमानास्पद असल्याचे सांगतात. फवादला याबद्दल विचारलं की तो थोडासा लाजल्यासारखा होतो. इतकी र्वष मी माझ्या मायदेशात मॉडेलिंग आणि टीव्ही मालिकांमधून काम के लं आहे. या सगळ्यामध्ये तिथल्या माझ्या सहकलाकारांबरोबर माझं एक घट्ट नातं तयार झालं आहे. आणि आज ते जेव्हा माझ्याविषयी असं काही बोलतात तेव्हा एकाचवेळी आनंदही वाटतो आणि भीतीही वाटते, असं फवाद म्हणतो.
मुळात, ‘खुबसूरत’ हा माझा पहिला बॉलीवूडपट आहे आणि माझ्याभोवती एवढी मोठी कलाकारमंडळी आहेत की मला अजूनच निराश आणि अस्वस्थ व्हायला होतं. त्यात माझे पाकिस्तानी सहकारी माझ्याकडे मोठय़ा अपेक्षेने बघताहेत हे ऐकल्यावर साहजिकच आपल्या खांद्यावर नाही म्हटलं तरी एक मोठी जबाबदारी आहे, एक बांधीलकी आहे याचं दडपणही जाणवतं. पण, जसं मी म्हटलं तसं
की कुठेतरी त्यांची माझ्याबाबतीत असणारी ही भावना मला आतून खुशनूमा करून टाकते.. असं त्याने सांगितलं. अनिल कपूरची निर्मिती असलेला ‘खुबसूरत’ या चित्रपटाची कथाकल्पना १९८० साली आलेल्या हृषीकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘खुबसूरत’ चित्रपटावरून घेतलेली आहे. आमचा चित्रपट त्या ‘खुबसूरत’चा रिमेक नाही हे मला आवर्जून सांगावंसं वाटतं.. असे फवाद म्हणतो. मी लहानपणी रेखा आणि राकेश रोशन या जोडीचा ‘खुबसूरत’ पाहिला आहे. आणि राकेश रोशन यांच्याविषयी माझ्या मनात जो आदर आहे त्या पूर्ण आदराने सांगतो की तो चित्रपट खरोखर विनोदी होता. त्यात विनोदाच्या अंगाने आलेली रोमँटिक क था होती. आत्ताचा ‘खुबसूरत’ हा पूर्णपणे रोमँटिक कॉमेडी आहे आणि त्यात माझी व्यक्तिरेखा राकेश रोशन यांच्या भूमिकेसारखी प्रेमात पुढाकार घेणारी अजिबात नाही, असं फवाद स्पष्ट करतो.
बॉलीवूडमध्ये पदार्पण तेही अनिल कपूर यांची निर्मिती असलेला चित्रपट.. काय विचार आला असेल फवादच्या मनात? पाकिस्तानमध्ये हिंदी चित्रपट, कलाकार खूप लोकप्रिय आहेत. मी तर लहानपणापासून अनिल कपूर यांचे भरपूर चित्रपट पाहिले आहेत. त्यामुळे त्यांच्या चित्रपटात काम करायचं आहे ही मोठी गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे, पण ते असे समोर आल्यावर माझं काय होणार?, या विचारानेच मी गळून गेलो होतो, असं फवाद सांगतो. म्हणजे काही नावाजलेल्या व्यक्तीच अशा असतात ना की त्यांना भेटताना आपल्या मनात त्यांच्याबद्दल जी प्रतिमा असते, प्रेम असते त्यामुळे आपल्याला त्यांच्याकडे साधं मान वर करून बोलण्याचीही हिंमत होत नाही.. अर्थात, हा माझा अनुभव आहे. म्हणजे आमच्याकडेही एक मोठे दिग्दर्शक होते. आज ते हयात नाहीत. त्यांना भेटायला मिळालं तेव्हा मला कोण आनंद झाला होता. पण, जेव्हा त्यांच्यासमोर बसलो होतो तेव्हा धड त्यांच्याकडे पाहून नीट बोलूही शकलो नाही इतका त्यांच्याबद्दल आदर मनात भरून राहिलेला होता. त्यामुळे, इथे तर अनिल कपूर यांच्याबरोबर काम करायचं होतं.. पोटात गोळा आला होता माझ्या.. फवाद अगदी आठवून सांगतो.
प्रत्यक्षात अनिल कपूरला भेटल्यावर सगळंच उलटं झालं, असं फवाद म्हणतो. त्यांना भेटल्यावर ‘अरेच्चा! पडद्यावर तर फार मोठे वाटतात हे..’ ही माझी पहिली प्रतिक्रिया होती, असं फवादने सांगितलं. असं मनमोक ळं वाटणं हेही अनिल कपूरमुळेच शक्य झाल्याचं तो म्हणतो. ते स्वत:च इतके मनमिळावू आहेत की समोरच्याला पहिल्याच भेटीत जिंकून घेतात. हे जसं अनिल कपूरचं आहे तसंच सोनमचंही आहे. आणि मी मुद्दामहून सोनमच्या स्वभावाबद्दल जाहीरपणे सांगतो आहे, असंही तो म्हणतो. सोनम एक चांगली अभिनेत्री आहे, ती एक चांगली सहकलाकार आहे, एक छान व्यक्ती आहे आणि तितकीच चांगली मैत्रीण आहे. तिला सगळ्या गोष्टींबद्दल उत्सुकता असते. ती तुम्हाला तिच्याबरोबर प्रत्येक गोष्टीत सहभागी करून घेते. म्हणूनच आमच्यात एक छान मैत्रीचं नातं निर्माण झालं आहे, असं त्याने सांगितलं.
‘खुबसूरत’ प्रदर्शित झाल्यावर पुढे काय होईल हे माहत नाही. मात्र, या चित्रपटाबरोबर आलेला अनुभव खूप काही देऊन गेला आहे, असं त्याने सांगितलं. बिकानेरमध्ये चित्रीकरण सुरू असताना माझा वाढदिवस होता. मला त्या वेळी घरी जाणं शक्य नव्हतं. त्यामुळे उदास होतो, नेहमीसारखं कामात मन रमवत होतो. तेवढय़ा वेळात या मंडळींनी माझ्या घरच्यांशी संवाद साधला. माझ्यासाठी घरच्यांच्या शुभेच्छांचा एक खास व्हिडीओ मागवला. मला खोलीत बोलावून हे सगळं दाखवलं. तेव्हा मी ढसाढसा रडलो.. अगदी आनंदाश्रू होते ते माझे.. पण, या सगळ्यांनी मला जिंकून घेतलंय खास. असं सांगतानाही फवाद आनंदातच असतो. त्याचा आनंद आणखीन द्विगुणित झाला आहे कारण, ‘खुबसूरत’ प्रदर्शित व्हायच्या आधीच त्याला यशराज प्रॉडक्शनचा आगामी चित्रपटही मिळाला आहे. ज्यात तो करीना कपूर खानबरोबर दिसणार आहे. त्यामुळे पाकिस्तानहून निघालेली त्याची ‘खुबसूरत’ कारकीर्द बॉलीवूडमध्ये फार लवकर स्थिरावू पाहते आहे. फक्त भारतीय प्रेक्षकांचाही दीदार आपल्याला मिळेल का?, याची तो मनापासून वाट पाहतो आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा