ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर सध्या चांगलेच चर्चेत आहेत. त्याचं कारण म्हणजे त्यांनी पाकिस्तानमध्ये एका कार्यक्रमाला हजेरी लावली आणि भर कार्यक्रमात त्यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावरून पाकिस्तानला चांगलंच सुनावलं. त्यांच्या वक्तव्यानंतर तिथे उपस्थित सर्वजण टाळ्या वाजवत होते. पण नंतर मात्र पाकिस्तानी नेटकरी आणि कलाकार जावेद अख्तर यांच्या वक्तव्याचा निषेध करत आहेत. पाकिस्तानी अभिनेत्री सबूर अलीने जावेद अख्तर यांच्या वक्तव्यावर दिलेली प्रतिक्रिया व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“तुम्हाला सुखरूप जाऊ दिलं” म्हणणाऱ्या पाकिस्तानी कलाकारांना जावेद अख्तर यांचं सडेतोड उत्तर; म्हणाले, “त्या दिवशी…”

सबूर अलीने आपल्या इन्स्टा स्टोरीवर लिहिलं, “कोणीतरी आपल्याच घरी येऊन आपला अपमान करून जात आहे आणि त्यावर आनंद व्यक्त केला जातोय. किती लाजिरवाणी गोष्ट आहे. सुशिक्षित असलेले अशिक्षित लोक. आपल्या इथल्या प्रतिभेला इतका आदर कधीच दिला नाही. आपल्या देशातील अनेक मोठमोठे कलाकार ज्यांच्याकडे त्यांच्या शेवटच्या क्षणी उपचारासाठीही पैसे नव्हते, टॅलेंटला दाद देणारे हे लोक तेव्हा कुठे गेले होते?” असा प्रश्न तिने विचारला.

जावेद अख्तर यांच्या विधानावर सबूर अलीची प्रतिक्रिया

पुढे सबूर अली म्हणाली, “ज्यांना स्वतःचा आदर कसा करायचा हे माहीत नाही, त्यांचा आदर इतर कोणी कसा करेल. मान्य आहे की कलेला कोणत्याच सीमा नसतात, पण सीमा आणि रेषा आपल्या आदरासाठी आखल्या जातात,” असं ती म्हणाली.

जावेद अख्तर यांच्या विधानावर सबूर अलीची प्रतिक्रिया

सबूर अलीने यावेळी जावेद अख्तर यांना टोलाही लगावला. त्यांनी पाकिस्तानबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर “आमचं मन तर इतकं मोठं आहे की आम्ही त्यांना सुखरूप परत पाठवतो आणि त्यांना चहाही प्यायला देतो,” असंही सबूर म्हणाली.

सबूर अलीचा जावेद अख्तर यांना टोला

दरम्यान, जावेद अख्तर यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करत पाकिस्तानला चांगलंच सुनावलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेक पाकिस्तानी कलाकार जावेद अख्तर यांच्यावर टीका करत आहेत, तर अख्तर यांनी तिथे बोलण्याची हिंमत दाखवली याबद्दल भारतीय त्यांचं कौतुक करत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistani actress saboor aly reaction on javed akhtar statement hrc