Pakistani Actress Sehar Shinwari On Chandrayaan-3 Success : भारतीय सध्या चांद्रयान ३ चं यश साजरं करत आहे. चांद्रयान ३ ने चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केलं. या अद्भुत कामगिरीसाठी जगभरातील इस्रोच्या शास्त्रज्ञांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. चांद्रयान ३ च्या यशानंतर पाकिस्तानी अभिनेत्रीची प्रतिक्रिया व्हायरल होत आहे. भारताचं कौतुक करताना तिने पाकिस्तानला टोला लगावला आहे.
पाकिस्तानी अभिनेत्री सेहर शिनवारी म्हणाली, “भारताशी शत्रुत्व असलं तरी चंद्रयान ३ च्या माध्यमातून त्यांनी अंतराळ संशोधनात इतिहास घडवल्याबद्दल मी इस्रोचे अभिनंदन करते. पाकिस्तान आणि भारत यांच्यातील दरी सर्व बाबींमध्ये इतकी वाढली आहे की आता पाकिस्तानला तिथे पोहोचण्यासाठी दोन ते तीन दशकं लागतील. दुर्दैवाने, आजच्या आपल्या दुर्दशेला इतर कोणी नाही तर आपणच जबाबदार आहोत.”
सेहरने भारताचं अभिनंदन करणारं ट्वीट करण्याआधी उर्दूमध्ये आणखी एक ट्वीट केलं होतं. “आज भारत कुठे पोचला आहे आणि आपला देश मौलवी तमिजुद्दीनची विधानसभा बेकायदेशीरपणे बरखास्त केल्यापासून कायदा आणि संविधानाच्या वर्चस्वासाठी झटत आहे, हे पाहून खरोखरच आपली मान शरमेने झुकली आहे. आज भारताने हे सिद्ध केले आहे की आपल्यातील दरी इतकी वाढली आहे की ती कमी करणं आता पाकिस्तानच्या हातात राहिलेलं नाही,” असं सेहरने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, चांद्रयान ३ चे विक्रम लँडर हे बुधवारी (२३ ऑगस्ट) संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले. त्यानंतर २ तास २६ मिनिटांनी प्रज्ञान रोव्हर लँडरमधून बाहेर आले. रोव्हर पुढचे १४ दिवस चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर वाटचाल करणार आहे आणि तिथली माहिती इस्रोला पाठवणार आहे.