भारतीय संघाचा क्रिकेट विश्वचषक २०२३ स्पर्धेतील अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला. या पराभवानंतर भारतीय चाहते निराश झाले, पण ते आपल्या संघाच्या पाठिशी उभे राहिले. भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेत उत्तम कामगिरी केली होती, पण फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने ६ गडी राखून भारतावर विजय मिळवला. भारताच्या पराभवाबद्दल पाकिस्तानी अभिनेत्रीने एक पोस्ट केली, पण नेटकऱ्यांनी तिलाच ट्रोल केलं.
पाकिस्तानी अभिनेत्री सेहर शिनवारीने एका युजरची पोस्ट शेअर करत “आज शेजाऱ्यांच्या देशात टीव्ही फुटत आहेत,” असं कॅप्शन दिलं. तिने विशाल कुमार नावाच्या युजरची पोस्ट शेअर केली. त्यात फुटलेल्या टीव्हीचा फोटो आणि भारतीय टीमला कधीच सपोर्ट करणार नाही आणि यापुढे कधीच क्रिकेट बघणार नाही, असं लिहिलं होतं. पण तिच्या याच पोस्टवरून तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.
सेहर शिनवारीने ज्या युजरची पोस्ट शेअर केली आहे, तेच फेक अकाउंट होतं. त्याच्या प्रोफाईलचा स्क्रीनशॉट टाकत एक युजर म्हणाला, ‘मला वाटतं की हा पाकिस्तानमधील सीन आहे, जेव्हा ते अफगाणिस्तानविरुद्ध हरले होते.’ ‘अशिक्षित बाई ते अकाउंट पाकिस्तानचंच आहे, स्वतःचा अपमान करून घेण्यात आनंद वाटतोय का,’ अशा कमेंट युजर्स करत आहेत.
दरम्यान, विश्वचषक २०२३ च्या अंतिम सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला २४१ धावांचं आव्हान दिलं होतं. ते लक्ष्य ऑस्ट्रेलियाच्या टीमने ४ गडी गमावत ४३ षटकात पूर्ण केलं आणि सहाव्यांदा वनडे वर्ल्ड चॅम्पियन झाले.