पाकिस्तानी अभिनेत्री उश्ना शाह विवाहबंधनात अडकली आहे. तिने लग्नातील व्हिडीओ शेअर केला होता. त्या व्हिडीओतील तिचा लाल रंगाचा लेहेंगा आणि ब्राइडल लूकची चांगलीच चर्चा होत आहे. तिचा हा ब्रायडल लूक पाहून चाहत्यांनी त्यावर कमेंट्स केल्या आहेत. उश्नाने इंडियन ब्राइडसारखा लूक केल्याने तिच्याच देशातल्या लोकांनी तिच्यावर संस्कृती विसरल्याची टीका केली.
पाकिस्तानी अभिनेत्री उश्ना शाहने गोल्फर हमजा अमीनशी लग्न केलं. सोशल मीडियावर नवविवाहित जोडप्याचे फोटो आणि व्हिडीओ खूप व्हायरल होत आहेत. उश्नाने तिच्या खास दिवशी लाल रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. ती भारतीय नववधूसारखी दिसत होती. तिने शेअर केलेल्या व्हिडीओत ती लग्न एंजॉय करताना दिसत आहे. मात्र, काही लोक तिच्या लग्नातील लाल लेहेंगा आणि डान्समुळे खूश नसल्याचं त्यांच्या कमेंट्समधून दिसून आलं.
“पाकिस्तानी लोकांची स्वतःची संस्कृती आणि धर्म आहे. भारतीय संस्कृती पाकिस्तानात आणण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही मुस्लीम आहोत आणि आमचा धर्म आम्हाला असे कपडे घालण्याची परवानगी देत नाही. नकारात्मकता पसरवणं थांबवा,” “पाकिस्तानी नववधू अशा भारतीय स्टाईलमध्ये का कपडे घालत आहेत? ही आमची संस्कृती नाही”, “पाकिस्तानी संस्कृतीच्या नावाखाली भारतीय संस्कृतीचा प्रचार करून लोकांना मूर्ख बनवत आहात. हे आमच्याच संस्कृती, पारंपरिक मूल्ये आणि धार्मिक मूल्यांच्या विरोधात असल्याने आम्ही हे खपवून घेणार नाही,” अशा प्रकारच्या कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. त्यावर उश्नाने प्रतिक्रिया दिली आहे.
उश्नाने रविवारी तिच्या लग्नाच्या पोशाखावर आणि डान्सवर आक्षेप घेणाऱ्यांना इंस्टाग्राम स्टोरीतून उत्तर दिलं. “ज्यांना माझ्या ड्रेसची अडचण आहे त्यांच्यासाठी ही पोस्ट, तुम्हाला माझ्या लग्नासाठी आमंत्रण नव्हतं किंवा तुम्ही माझ्या लाल लेहेंग्यासाठी पैसेही दिले नाहीत. माझे दागिने, माझे कपडे पूर्णपणे पाकिस्तानी आहे. लग्नात न बोलावता आलेल्या फोटोग्राफर्सना सलाम,” असा टोला तिने लगावला.
उश्ना पाकिस्तानमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत ‘थोडा सा आसमान’, ‘निले किनारे’, ‘रुबरू इश्क’ अशा मालिकांमध्ये काम केलं आहे.