पाकिस्तानकडून ऑस्करसाठी पाठवण्यात आलेला ‘जॉयलँड’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी चांगलाच चर्चेत होता. त्याचं कारण म्हणजे पाकिस्तानकडून या चित्रपटाला ऑस्करसाठी पाठवण्यात आलं होतं, त्यानंतर ४ नोव्हेंबरला याचा ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आला होता. पण ऑस्करसाठी पाठवलेल्या याच चित्रपटाच्या प्रदर्शनावर पाकिस्तानने बंदी घातली होती. त्यामुळे पाकिस्तानची सोशल मीडियावर खिल्ली उडवली गेली होती. आता या चित्रपटाबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
कियारा अडवाणीच्या ‘त्या’ गुलाबी स्कार्फची जोरदार चर्चा; किंमत ऐकून थक्क व्हाल
‘जॉयलँड’ हा चित्रपट आता भारतात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून भारतात चित्रपटाची अधिकृत रिलीज तारीख शेअर केली आहे. या चित्रपटाच्या पोस्टरसोबतच निर्मात्यांनी वेगवेगळ्या देशांमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. ‘जॉयलँड’ भारतात १० मार्चला प्रदर्शित होणार आहे.
कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रीमियर होणारा ‘जॉयलँड’ हा पहिला पाकिस्तानी चित्रपट होता. कान्स येथे प्रदर्शनाच्या शेवटी या चित्रपटाला स्टँडिंग ओव्हेशन मिळाले आणि चित्रपट महोत्सवात ज्युरी अवॉर्डही देण्यात आला होता. जगभरातील समीक्षकांनी ‘जॉयलँड’चे भरभरून कौतुक केले होते, त्यामुळे चित्रपटाला पाकिस्तानने ऑस्करसाठी निवडलं होतं.
काही काळाने दिग्दर्शक सॅम सादिक यांच्या ‘जॉयलँड’ या चित्रपटावरून पाकिस्तानमध्ये बराच वाद झाला होता. हा चित्रपट १८ नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता आणि सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र आधीच मिळाले होते. पण रिलीज होण्यापूर्वीच अनेक संघटना आणि राजकीय पक्षांनी या चित्रपटाला ‘आक्षेपार्ह’ आणि देशाच्या ‘नैतिक आणि सामाजिक आदर्शांच्या विरोधात’ असल्याचं म्हटलं. ‘जॉयलँड’बद्दल आलेल्या तक्रारींचा हवाला देत सरकारने त्याच्या प्रकाशनावर बंदी घातली होती. तोच चित्रपट आता भारतात प्रदर्शित होणार आहे.