पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांना दुबई विमानतळावर अटक करण्यात आली असल्याचं वृत्त माध्यमांमध्ये झळकलं होतं. मात्र, अटकेच्या अफवा असल्याचं स्पष्टीकरण आता गायक राहत फतेह अली खान यांनी एक व्हिडीओ शेअर करत दिलं आहे. दरम्यान, दुबईमधील बुर्ज दुबई पोलीस स्टेशनमध्ये राहत फतेह अली खान यांच्या मॅनेजरने तक्रार दाखल केल्याचं सांगण्यात येत होतं. तसेच मॅनेजरच्या तक्रारीनंतर दुबई पोलिसांनी राहत फतेह अली खान यांना अटक केल्याचं वृत्त समोर आलं होतं. मात्र, या सर्व प्रकरणासंदर्भात आता राहत फतेह अली खान यांनी स्पष्टीकरण देत अटकेच्या कारवाईचे वृत्त फेटाळून लावले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राहत फतेह अली खान यांनी काय म्हटलं?

“मी सध्या दुबईमध्ये माझे गाणे रेकॉर्ड करण्यासाठी आलो आहे. या ठिकाणी गाणे अतिशय चांगले रेकॉर्ड होत असून या ठिकाणी सर्व व्यवस्थित आहे. मी सर्वांना आवाहन करतो की, अफवांवर विश्वास ठेवू नका. माझे शत्रू जे विचार करत आहेत, पण तसं काहीही झालेलं नाही. मी माझ्या सर्व चाहत्यांना आवाहन करतो की खोट्या बातम्यांकडे लक्ष देऊ नका. विश्वास ठेवू नका. तुमचाही वेळ वाया घालवू नका. मी लवकरच माझ्या सुपरहीट गाण्यांसह तुमच्या समोर येईल”, असं राहत फतेह अली खान यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान दुबई विमानतळावर अटक, बुर्ज पोलिसांची कारवाई

नेमकं काय घडलं होतं?

पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान आणि त्यांचा मॅनेजर अहमद सलमान यांच्यात दुबईतील एका कॉन्सर्टवरुन वाद झाला असल्याचं वृत्त समोर आलं होतं. मात्र, आर्थिक देवाण-घेवाणीवरुन दोघांमधील हा वाद पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचल्याची चर्चा होती. त्यानंतर पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचं वृत्त ANI या वृत्तसंस्थेने दिलं होतं. दरम्यान, दुबईतील शो केल्यानंतर परतत असताना दुबई पोलिसांनी थेट विमानतळावरुनच राहत फतेह अली खान यांना अटक केल्याचं वृत्तात म्हटलं होतं. दरम्यान, राहत फतेह अली खान यांच्या अटकेच्या वृत्तानंतर आता त्यांनी स्वत: यासंदर्भात स्पष्टीकरण देत या सर्व अफवा असल्याचं म्हटलं आहे. तसेच या अफवांवर चाहत्यांनी विश्वास ठेवू नये, असं आवाहनही राहत फतेह अली खान यांनी केलं आहे.

राहत फतेह अली खान याआधीही वादात अडकले होते

गायक राहत फतेह अली खान या आधीही वादात अडकले होते. त्यांचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओमध्ये राहत फतेह अली खान एका व्यक्तीला चपलेने मारताना दिसले. मात्र, या व्हिडीओची जबाबदारी घेत त्यांनी माफीही मागितली होती. व्हिडिओत राहत फतेह अली खान नोकराला बेदम मारहाण करताना दिसले होते. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं. त्यानंतर त्यांनी माफी देखील मागितली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistani singer rahat fateh ali khan reacts reports of arrest at dubai airport are false gkt
Show comments