पाकिस्तानी लेखक आणि दिग्दर्शक यासिर हुसेनने भारतीय टेलिव्हिजन मालिकांवर टीका केली आहे. भारतीय टीव्ही मालिकांना त्याने विषारी म्हटलंय आणि आपल्या मुलाने मनोरंजन क्षेत्रात यावं, अशी आपली इच्छा नसल्याचं त्याने नमूद केलं. ‘समथिंग हाऊट’ला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीदरम्यान यासिरने पाकिस्तानी टेलिव्हिजन मालिकांवरही टीका केली. अभिनेत्यांचं काम चांगल्या कलाकृतीला प्रोत्साहन देणं आहे परंतु सातत्याने कामाचा दर्जा घसरला आहे.
भारतीय मालिका नकारात्मक – यासिर हुसैन
होस्टने यासिरला भारतीय टेलिव्हिजन मालिकांबद्दल विचारलं तेव्हा तो म्हणाला, “तुम्ही भारतातील टीव्ही मालिका पाहिल्या आहेत का? ज्यांच्याकडे कमी दर्जाच्या मालिका आहेत, ते आमच्या पाकिस्तानी मालिका पाहत आहेत. त्यांच्याशिवाय पाकिस्तानी मालिका इतर कोण पाहतंय? आमच्या मालिका फक्त तेच लोक पाहतात ज्यांच्या देशातील मालिका खराब आहेत. भारतात खूप नकारात्मक, विषारी मालिका आहेत. आमच्या मालिका त्यांच्यापेक्षा चांगल्या आहेत, म्हणून ते बघत आहेत.”
पाकिस्तानी इंडस्ट्री चांगली नाही – यासिर हुसेन
यासिर हुसेनला पाकिस्तानी मालिकांबद्दल विचारण्यात आल्यावर तो म्हणाला, “आमची इंडस्ट्री चांगली नाही. माझ्या मुलाने या इंडस्ट्रीत यावं असं मला वाटत नाही… ही नोकरी आहे का? चांगला अभिनय करणं हे अभिनेत्याचं काम असते. हे असं क्षेत्र आहे जिथे तुम्ही तुमच्या कलेला प्रोत्साहन दिले पाहिजे, परंतु सातत्याने वाईट कामाची ऑफर दिली जात आहे.”