यंदा भारताकडून ऑस्करसाठी ‘आरआरआर’ आणि ‘काश्मिर फाइल्स’सारख्या चित्रपटांना डावलून ‘छेलो शो’ या गुजराती चित्रपटाला पाठवण्यात आलं. यावरुन चांगलाच वादही झाला. ऑस्करसाठी कोणता चित्रपट पाठवणं योग्य होत यावरुन बरीच मतंमतांतरे सोशल मीडियावर मांडली गेली. अशीच काहीशी गोष्ट पाकिस्तानात घडली आहे, पण यात थोडा फरक आहे पाकिस्ताननेदेखील यावर्षी एक चित्रपट ऑस्करसाठी पाठवला होता, पण आता त्यांनीच त्या चित्रपटावर बंदी आणली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाकिस्तानकडून ऑस्करसाठी पाठवण्यात आलेला ‘जॉयलँड’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. पाकिस्तानकडून या चित्रपटाला ऑस्करसाठी पाठवण्यात आलं शिवाय ४ नोव्हेंबरला याचा ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आला. पण आता ऑस्करसाठी पाठवलेल्या याच चित्रपटावर पाकिस्तानने बंदी घातल्याने सोशल मीडियावर त्यांची बरीच खिल्ली उडवली जात आहे.

आणखी वाचा : ‘कांतारा’स्टार रिषभ शेट्टीच्या पत्नीच्या खांद्यावर होती ‘ही’ जबाबदारी म्हणाली “गरोदर असतानाही चित्रपटासाठी…”

ऑस्करला पाठवण्याआधी चित्रपट पाहत नाही का असा सवाल करत नेटकऱ्यांनी त्यांच्या या निर्णयाची खिल्ली उडवली आहे. चित्रपटात काही आक्षेपहार्य गोष्टी दाखवण्यात आल्याने तिथल्या सूचना आणि प्रसारण मंत्रालायाने या चित्रपटावर बंदी घातल्याचं स्पष्ट झालं आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलसह इतरही आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हा चित्रपट सादर करण्यात आला होता आणि समीक्षकांनी याचं कौतुकही केलं. सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला प्रमाणपत्र देऊनही या चित्रपटाच्या आशयावरुन याला विरोध होऊ लागल्याने पाकिस्तान सरकारने या चित्रपटावर बंदी घातली आहे.

पितृसत्ताक समाजाचं चित्रण करणाऱ्या या चित्रपटाच्या कथानकात एक लहान मुलगा आणि एक ट्रान्सजेंडर महिला यांच्यातील नात्यावर भाष्य करण्यात आलं आहे. त्यामुळे यातील काही दृश्यं ही समाजासाठी योग्य नसल्याने या चित्रपटावर बंदी घातल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. ‘जॉयलँड’ या चित्रपटात सानिया सईद, अली जुनेजो, अलिना खान, सरवत गिलानी, रस्ती फारूख, आणि सोहेल समीर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. १८ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, पण पाकिस्तानने घातलेल्या या बंदीमुळे आता याच्या प्रदर्शनावरही प्रश्नचिन्हं उभं राहिलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistanti film joyland sent for oscar official entry is officially banned in pakistan now avn