बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान सातत्याने चर्चेत येत असतो. नुकताच त्याचा प्रदर्शित झालेला ‘पठाण’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. केवळ भारतातच नव्हे तर परदेशातदेखील चित्रपटाने तुफान कमाई केली. जभरातुन चित्रपटाने १००० कोटींचा टप्पा पार केला आहे. तब्बल ४ वर्षांनंतर शाहरुख मोठ्या पडद्यावर दिसल्याने त्याच्या चाहत्यांनी चित्रपट डोक्यावर घेतला आहे. शाहरुखचे चाहते देशातच नव्हे तर परदेशात ही आहेत. अशाच एका जबरा फॅनने शाहरुखचे वाळूवर चित्र तयार केले आहे.
शाहरुखचे चाहते दरवर्षी त्यांच्या वाढदिवसाला मन्नतवर गर्दी करत असतात. देशभरातुन चाहते येत असतात. शाहरुखची क्रेझ पाकिस्तानातदेखील आहे. समीर सौकत आणि त्याच्या बरोबरच्या काही कलाकार मंडळींनी शाहरुखचे वाळूत चित्र काढले आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवरून त्या चित्राचा फोटो शेअर करत माहिती दिली आहे. हा फोटो शेअर करताच त्यावर कमेंट्सचा वर्षाव होत आहे. पाकिस्तानातील गदानी समुद्राकिनाऱ्यावर हे चित्र काढण्यात आले आहे.
‘पठाण’ला दिलेल्या तुफान प्रतिसदानंतर शाहरुख खानचे चाहते त्याच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. त्याच्या येणाऱ्या चित्रपटांच्या यादीत ‘डंकी’ आणि ‘जवान’ हे चित्रपट आहेत. ‘जवान’ हा चित्रपट शाहरुख खानचा या वर्षातील दुसरा बिग बजेट चित्रपट आहे. साऊथचे प्रसिद्ध दिग्दर्शक एटली या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
शाहरुख खानबरोबरच या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा आणि अभिनेता विजय सेतुपतीदेखील महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. तसेच शाहरुख खान सलमान खानच्या ‘टायगर ३’ चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.