विवेक अग्निहोत्री यांचं दिग्दर्शन असलेला ‘द कश्मीर फाइल्स’ सध्या वेगवेगळ्या कारणांनी गाजतोय. या चित्रपटाचं एकीकडे कौतुक केलं जातंय तर दुसरीकडे या चित्रपटावरून वेगवेगळे वादही सुरू आहे. काही लोक चित्रपटाला पाठिंबा देतायत तर काही विरोध करतानाही दिसत आहेत. अनेक राज्यांमध्ये टॅक्स फ्री झालेल्या या चित्रपटानं आत्तापर्यंत २०० कोटींचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाची केवळ सामाजिकच नाही तर राजकीय स्तरावरही चर्चा झाली.
‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटावर आतापर्यंत अनेक राजकीय व्यक्तींनी प्रतिक्रिया दिली आहे. जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी अलिकडेच या चित्रपटावर आपली प्रतिक्रिया दिली होती. ‘यासाठी जर मी दोषी असेन तर मी फासावर चढायलाही तयार आहे.’ असं त्यांनी या चित्रपटाविषयी बोलताना म्हटलं होतं. त्यांच्या याच विधानावर आता ‘द कश्मीर फाइल्स’च्या अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
फारुख अब्दुल्ला यांच्या प्रतिक्रियेवर बोलताना पल्लवी जोशी म्हणाल्या, ‘आम्ही चित्रपटात कोणतीही चुकीची गोष्ट दाखवलेली नाही. चार वर्षांचं संशोधन आणि काही कायदेशीर कागदपत्रांच्या आधारावरच या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. आजही आमच्याकडे ते सर्व व्हिडीओ आणि संशोधन आहे ज्यात सरकारी कर्माचाऱ्यांपासून ते प्रशासकीय अधिकारी, पोलीस या सर्वांची स्टेटमेंट आहेत. ७०० लोक खोटं बोलत नाहीयेत.’
आणखी वाचा- शरद पवारांच्या नातवाचा प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत फोटो व्हायरल, चर्चांना उधाण
पल्लवी जोशी पुढे म्हणाल्या, ‘काश्मिरी पंडितांसोबत जेव्हा हे अत्याचार झाले होते. त्यांच्या हत्या झाल्या होत्या. त्याच्या दोन दिवस आधीच फारुख अब्दुल्ला यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता आणि ते लंडनला रवाना झाले होते. त्यावेळी जगमोहन यांच्याकडे गव्हर्नर पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. पण खराब झालेल्या हवामानामुळे त्यांना जम्मूला जाण्यापासून थांबवण्यात आलं आणि याच वेळी कश्मिरी पंडितांवर अत्याचार करून त्यांच्या हत्या करण्यात आल्या.’