‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटात राधिका मेनन ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री पल्लवी जोशी यांचा आज वाढदिवस. नकारात्मक भूमिका असूनही पल्लवी जोशी यांच्या या व्यक्तीरेखेची बरीच चर्चा झाली होती. पल्लवी जोशी मागच्या बऱ्याच वर्षांपासून कला क्षेत्रात कार्यरत आहेत. पण या भूमिकेनं त्यांना वेगळी ओळख मिळवून दिली. पल्लवी जोशी या दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांची पत्नी आहेत. पल्लवी आणि विवेक यांची लव्ह स्टोरी खूपच रंजक आहे. पहिल्या भेटीत पल्लवी यांना विवेक अग्निहोत्री अजिबात आवडले नव्हते.
पल्लवी जोशी यांचा जन्म ४ एप्रिल १९६९ रोजी मुंबईमध्ये झाला. त्यांनी फार कमी वयात स्टेज परफॉर्म करायला सुरुवात केली होती. बालकलाकार म्हणून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यांनी ‘बदला’ आणि ‘आदमी सड़क का’ या चित्रपटांमध्ये काम केलं होतं. याशिवाय पल्लवी जोशी यांनी टीव्ही मालिका ‘अल्पविराम’मध्येही काम केलं होतं. त्यांनी या मालिकेत एका बलात्कार पीडितेची भूमिका साकाराली होती ज्याने प्रेक्षकांवर वेगळी छाप सोडली होती. याशिवाय पल्लवी जोशी यांनी ९० च्या दशकात ‘तहलका’, ‘मुजरिम’ आणि ‘सौदागर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं होतं.
आणखी वाचा- सलमान- अक्षय- सैफ पोहोचले शाहरुख खानच्या ‘मन्नत’वर, वाचा नेमकं काय घडलं
पल्लवी जोशी आणि विवेक अग्निहोत्री यांची लव्हस्टोरी
पल्लवी जोशी आणि विवेक अग्निहोत्री यांची पहिली भेट एका रॉक कॉन्सर्टमध्ये झाली होती. या कॉन्सर्टमध्ये दोघांनाही एका कॉमन फ्रेंडनं निमंत्रण दिलं होतं. पहिल्या भेटीत पल्लवी यांना विवेक अग्निहोत्री अजिबात आवडले नव्हते. त्या विवेक यांना उद्धट व्यक्ती वाटले होते. पण नंतर या दोघांमध्ये मैत्री झाली.
एका मुलाखतीत विवेक अग्निहोत्री यांनी सांगितलं होतं, ‘आम्ही दोघं एका कॉन्सर्टमध्ये भेटले होते. पण एकमेकांना पर्सनली ओळखत नव्हतो. तिला मी आवडलो नव्हतो. पण एक गोष्ट आमच्या दोघांमध्ये सारखी होती ती म्हणजे आम्ही दोघंही त्या कॉन्सर्टमध्ये कंटाळलो होतो. त्यानंतर आमच्यात हळूहळू मैत्री झाली आणि आम्ही एकमेकांना चांगल्या प्रकारे ओळखू लागलो.’