रेश्मा राईकवार
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
एखाद्या गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत नाहीत म्हणजे तसं काही आता घडतच नाही, असा समज करून घेऊन आपण मोकळे होतो. अनेकदा हा शहरी भागातला प्रश्न नाही. ग्रामीण भागातला असेल कदाचित.. खरंतर असं व्हायला नको. गावागावात इतक्या सोयी झाल्या आहेत सध्या.. अशी मतं मांडून त्या समस्यांचे अस्तित्वच मान्य केले जात नाही. ती समस्या खरंतर कुठल्याही एका माणसाची वा समाजाची नसते. तुमच्या-आमच्या जाणिवांची असते, संवेदनांची असते, विचारातून उमटणाऱ्या कृतीची असते. आपल्या एका चांगल्या कृतीने एखाद्याचं अस्तित्वच मिटण्यापासून आपण वाचवू शकतो, नपेक्षाही भविष्य घडवू शकतो. पण त्यासाठी खरोखरच उघडय़ा डोळय़ांनी आणि जागत्या मनाने आपल्याच संकुचित चौकटीपलीकडचं जग पाहायला हवं, याची जाणीव ‘पल्याड’ हा शैलेश भीमराव दुपारे दिग्दर्शित चित्रपट करून देतो.
मसणजोगत्याच्या कुटुंबाची गोष्ट सांगणारा हा चित्रपट महाराष्ट्र आणि कर्नाटक प्रांताच्या सीमाभागातील एका गावात आजही पाळल्या जाणाऱ्या अघोरी प्रथेवर आधारित आहे. या गावात आजही एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याची रात्री प्रेतयात्रा काढली जाते. गावकुसाबाहेर असलेल्या मसणजोगत्याकडे हे प्रेत आणले जाते. आणि त्याच्याकडून एका विशिष्ट पद्धतीने त्या माणसाच्या मुक्तीसाठी प्रार्थना करून घेतली जाते. अशा अनेक प्रथा ग्रामीण भागामध्ये आजही आहेत. पण इथे मुद्दा फक्त या अघोरी प्रथेचा नाही. तर या प्रथेच्या नावाखाली मसणजोगत्यांच्या समाजाला शिकण्याचा, प्रगती करण्याचा, इतरांसारखे सर्वसामान्यपणे जगण्याचा हक्कच नाकारला जातो, ही खरी समस्या आहे. आणि त्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न लेखक सुदर्शन खंडागळे यांनी केला आहे. या चित्रपटात म्हाद्या, त्याची सून आणि नातू या तीन व्यक्तिरेखांच्या माध्यमातून कथा उलगडत जाते. म्हाद्याच्या तरुण मुलाचे निधन झाले. तो एकटाच कमावता असल्याने मसणजोगत्याचा पिढीजात परंपरा तो सांभाळतो आहे. रात्रभर प्रेताच्या उशाशी झोपायचे, सकाळी लोकांना अस्थी काढून द्यायच्या आणि दिवसभर गावकऱ्यांकडून त्या बदल्यात दारोदार जोगवा मागून जे मिळेल ते खायचे हा त्यांचा दिनक्रम. म्हाद्याच्या नातवाला शिक्षणाची आवड आहे. तो शाळेत जाण्यासाठी आजोबा आणि आईच्या मागे लागला आहे. आईलाही आपल्या मुलाने शिकावं, मोठं व्हावं, मसणजोगत्यांचं हे पिढीजात काम न करता लोकांचं आरोग्य जपणारा डॉक्टर व्हावं असं वाटतं. तीही त्याला शाळेत घालण्यासाठी धडपडते. सरकारी योजनाही तळागाळातल्या विद्यार्थ्यांना शाळेत घेण्यासाठी उत्सुक आहेत. अधिकारी गावागावात भेटून प्रत्येकाला मुलांना शाळेत आणण्यासाठी आग्रह धरतायेत. पण म्हाद्याला आतून माहिती आहे की काहीही झालं तरी गाव आपल्या नातवाला शिकू देणार नाही. गावचं वास्तव आणि नातवाचं-सुनेचं स्वप्न यात हेलपाटलेला म्हाद्या, गावकऱ्यांच्या मुर्दाड, अन्यायी वागण्यामुळे भरडलेलं म्हाद्याच्या नातवाचं स्वप्न या सगळय़ाचं वास्तववादी चित्रण दिग्दर्शक शैलेश भीमराव दुपारे यांनी केलं आहे.
समस्या मांडणारी गोष्ट नेहमीच नकारी असते असं नाही. परिस्थिती कितीही भीषण असली तरी त्यातून वाट काढणाऱ्यांचा मार्ग सोपा नसेल, रक्ताळलेला असेल, तरीही तो आशादायी असतो हे लक्षात घ्यायला हवं. ‘पल्याड’ची मांडणी करताना लेखक- दिग्दर्शक द्वयीने हे भान कायम राखलं आहे. त्यामुळे अतिनाटय़, अतिरंजकता यांना फाटा देत, लोकांना विचार करायला लावणारा पण सातत्याने केलेले प्रयत्न कुठेतरी यश देऊन जातील ही आशा निर्माण करणारा चित्रपट त्यांनी दिला आहे. मरणानंतर आपल्याला मुक्ती मिळावी म्हणून एखाद्याला जगणंच नाकारणारा हा समाज किती भयाण आहे हे दाखवतानाच एखादी विचारी शिक्षिका, संवेदनशील गावकरी जर अन्यायाविरोधात आपापल्या परीने मदत करण्यासाठी उभा राहिला तर अंधारातूनही प्रकाश मिळू शकतो, हे मांडणारा हा चित्रपट उत्तम कलाकारांच्या अभिनयाने अधिक प्रभावी झाला आहे. शशांक शेंडे, देविका दफ्तरदार, रुचित निनावे हा बालकलाकार, देवेंदर दोडके, वीरा साथीदार अशा कसलेल्या कलाकारांच्या सहज अभिनयाने नटलेला हा संवेदनशील भावनापट आहे.
पल्याड
दिग्दर्शक – शैलेश भीमराव दुपारे कलाकार – शशांक शेंडे, देविका दफ्तरदार, रुचित निनावे, देवेंद्र दोडके, वीरा साथीदार.