रेश्मा राईकवार

पळशीची पीटी

Lovepreet Kaur
Illegal Migration: मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी अमेरिकेत जाण्यासाठी एजंटला दिले १ कोटी रुपये, महिन्याभरात स्वप्नांचा चुराडा
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Pankaja Munde Speech And Suresh Dhas Speech News
Politics : सुरेश धस देवेंद्र फडणवीस यांना म्हणाले ‘बाहुबली’; पंकजा मुंडे म्हणाल्या, “मी शिवगामी, मेरा वचनही है शासन”
tharla tar mag new promo yed lagla premacha fame raya manjiri enters the show
ठरलं तर मग : सायलीच्या मदतीला आले २ नवीन पाहुणे! पंढरपुरातून आणली ‘ही’ खास वस्तू, अर्जुनला ‘असं’ पळवून आणणार…; पाहा प्रोमो
entrepreneur ujjwala phadtare story in marathi
नवउद्यमींची नवलाई : कृत्रिम प्रज्ञेच्या पुरवठादार
Who is Liang Wenfeng?
Liang Wenfeng : लियांग वेंगफेंगची जगभर चर्चा! कोण आहे अमेरिकेत खळबळ उडवून देणाऱ्या ‘डीपसीक’चा कर्ताधर्ता?
Father Disappointed After Seeing Daughters English In Whatsapp Chat Viral on social media
PHOTO: वडिलांनी मुलीला ४० हजार पाठवल्याचा मेसेज केला; यावर मुलीचा रिप्लाय पाहून वडिल झाले शॉक; व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल
Canada Permanent Residency
कॅनडात कायमचं नागरिकत्व कसं मिळवायचं? नव्या वर्षांत चार नवे मार्ग खुले! जाणून घ्या

गावखेडय़ात गुणवान लोक असतात, मात्र त्यांना अनेकदा पुरेशा सोयीसुविधा नसल्याने, त्यांच्या गुणांबद्दल जागरूकता नसल्याने त्याचे सोने करायची संधी मिळत नाही. अशा वेळी उणिवांवर मात करत आपल्या बळावर पुढे येण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची धावही यशापर्यंत पोहोचतेच असे नाही. गुणवंतांच्या बाबतीत स्त्री-पुरुष असा भेद करण्यात हशील नाही, मात्र अजूनही मुलींच्या शिक्षणाकडे, त्यांच्या आयुष्याकडे पाहण्याचा जो मागास दृष्टिकोन आहे, त्यामुळे अंगी कला असूनही, जिद्द असूनही अशी अनेक स्वप्न उराशी बाळगणाऱ्या तरुणींच्या हरवलेल्या कथाच वाटय़ाला येतात. धोंडिबा बाळू कारंडे दिग्दर्शित ‘पळशीची पीटी’ हा अशाच एका कुस्करलेल्या स्वप्नाची कथा सांगणारा चित्रपट आहे.

साताऱ्यातील पळशी गावच्या धनगर कुटुंबातील भागीची (किरण ढाणे) ही गोष्ट आहे. दूर डोंगरावर एका झोपडीत राहणारा किशा, त्याची बायको आणि त्याच्या तीन मुली, एक मुलगा इतक्या मोठय़ा रहाटगाडग्याचा व्याप.. दोन मुलींची किशाने लग्न लावून दिली आहेत. भागी ही तिसरी मुलगी. भागीला शिक्षणात रस असल्याने दररोज काही मैल धावत जाऊन ती शाळेत पोहोचते. भागीचे गरजेपोटीचे हे धावणे हेच तिचे कसब बनते. आणि केवळ वरून आदेश आल्यामुळे शाळेने घेतलेल्या धावण्याच्या स्पर्धेत भागी पहिली येते. तालुका स्तरावरील स्पर्धेत पोहोचते. रोज शाळेत उशिरा येण्याची शिक्षा म्हणून मैदानाला चक्कर मारणाऱ्या भागीला तिच्या शिक्षकांनी उपहासाने दिलेलं नाव म्हणजे ‘पळशीची पीटी’. खरेतर, साताऱ्यातूनच प्रचंड संघर्ष करून धावपटू म्हणून नावारूपाला आलेली, आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ललिता बाबरसारखी तरुणी हे आजचे आपले सोनेरी वास्तव आहे. मात्र या यशामागे लपलेला खडतर संघर्ष अनेकदा आपल्या लक्षात येत नाही. शिक्षणाच्या नावाखाली उभी राहिलेली शिक्षणसम्राटांची दुकाने, त्यात मुलांना शिकवण्याचा इच्छेपेक्षा केवळ उदरनिर्वाहासाठी नोकरी करणारे शिक्षक, विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या बाबतीतच असलेली उदासीनता त्यांच्यातील कलागुणांना जोखून घडवणार तरी कशी? हे साध्य करणे खरेतर त्यांनाही कठीण नाही. पण, याबाबतीतला आदर्शवाद आणि वास्तव यांच्यातील तफावतच जास्त अनुभवायला मिळते. ‘पळशीची पीटी’ या चित्रपटात या सगळ्यावर भाष्य केले आहे.

कथाविषय म्हणून वास्तव मांडण्याचा दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचा प्रयत्न चांगला आहे. मात्र केवळ गोष्ट चांगली असून चालत नाही, त्याची मांडणीही तितकीच प्रभावी आणि सहज असायला हवी. इथे तंत्रापासून मांडणीपर्यंत चित्रपट तोकडा पडला आहे. दिग्दर्शकाचा हा पहिलाच प्रयत्न असल्याचे ठायी ठायी जाणवत राहते. अनेक ठिकाणी प्रतीकात्मक दृश्यांचा वापर, व्यक्तिरेखांची मांडणी ही ठोकळेबाज पद्धतीने पुढे येते. चित्रपटाच्या पूर्वार्धात गोष्ट फारशी पुढे सरकत नाही. त्यातही भागीच्या लग्नाची गोष्ट घुसडण्यात आली आहे. त्याहीपेक्षा भागीच्या प्रेमात पडणाऱ्याची गोष्ट रेटण्यात आली आहे. इथे हा प्रेमाचा भाग वाढवणे अर्थातच राहुल्या म्हणून ‘लागिरं झालं जी’ मालिकेतून प्रसिद्ध झालेल्या अभिनेता राहुल मगदुम याच्या लोकप्रियतेचा फायदा करून घेण्यासाठी होता. हे असेच ठोकताळे चित्रपटासाठी मारक ठरले आहेत. हा चित्रपट ‘लागिरं झालं जी’ मालिकेचा सिक्वल असल्याचा भास झाला तर त्यात नवल नाही.

चित्रपटाचे दिग्दर्शक धोंडिबा, पटकथाकार तेजपाल वाघ यांच्यापासून जवळपास चित्रपटातील मुख्य नायिका किरण ढाणे हिच्यासह सगळेच छोटे-मोठे कलाकार हे या मालिकेतील आहेत. या सगळ्या गोष्टींमुळे चित्रपटातील मूळ कथेची परिणामकारकताच हरवली आहे. किरणने या भूमिकेसाठी मेहनत घेतली आहे. मात्र या संपूर्ण चित्रपटात बिडकर सरांची व्यक्तिरेखा उत्तम उतरली आहे. ही भूमिका उत्तम लिहिली गेली आहे, पण त्याहीपेक्षा राहुल बेलापूरकर या कलाकाराने पैसे देऊन शिक्षण सेवक म्हणून कामावर लागण्याच्या गरजेपोटी आलेली लाचारी आणि मूलत: असलेला चांगुलपणाची आस या कात्रीत अडक लेले बिडकर उत्तम रंगवले आहेत.

खेळ आणि खेळाडू घडवण्याबाबतीत एकूणच सर्व स्तरावर पहायला मिळणारी उदासीनता हा तरुणाईच्या आणि पर्यायाने देशाच्या भविष्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचा विषय आहे. त्यावर चित्रपटातून फारसे भाष्य केले जात नाही. त्यामुळे विषय म्हणून ‘पळशीची पीटी’ हा चित्रपट खरेतर महत्त्वाचा ठरतो, पण त्याच्या मांडणीवर लेखक-दिग्दर्शकांनी अधिक मेहनत घ्यायला हवी होती. केवळ विनोदी चिमटय़ांपलीकडे आणि ठोकळेबाज पद्धतीने त्याकडे पाहण्यापेक्षा थोडा अधिक गांभीर्याने हा विषय मांडला असता तर ही पीटी नक्कीच लक्षात राहिली असती.

दिग्दर्शक – धोंडिबा कारंडे

कलाकार – किरण ढाणे, राहुल बेलापूरकर, धोंडिबा कारंडे, शिवानी घाटगे, तेजपाल वाघ, विद्या सावळे, राजू सहस्रबुद्धे, संजय डुबल, दीक्षा सोनवणे, नीलिमा कामाने, ज्ञानेश्वर माने, राहुल मगदुम.

Story img Loader