हॉलिवूड स्टार पामेला अँडरसन पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आहे. तब्बल ५ वेळा लग्न करणाऱ्या पामेला अँडरसनच्या नावाचा समावेश एका पूर्वश्रमीच्या पतीने त्याच्या इच्छापत्रात केला आहे. पामेलाचा पूर्वाश्रमीचा पती आणि हॉलिवूड निर्माता जॉन पीटर्सने फक्त १२ दिवसांच्या लग्नासाठी तिच्या नावावर खूप मोठी रक्कम ठेवली आहे. २०२० मध्ये या दोघांचं लग्न झालं होतं आणि त्याची बरीच चर्चा झाली होती. त्यानंतर आता जॉनच्या इच्छापत्रामुळे हे दोघं चर्चेत आले आहेत.
हॉलिवूड निर्माता जॉन पीटर्सने २०२० मध्ये पामेला अँडरसनशी लग्न केलं होतं. लग्न मोडल्यानंतर आता जॉनने स्वतःच्या इच्छापत्राबाबत मोठा खुलासा केला आहे. जॉनचं म्हणणं आहे की तो पामेलावर नेहमीच प्रेम करत राहील आणि ही रक्कम तो तिच्यासाठी ठेवत आहे. मग तिला याची गरज असो किंवा नसो. ७४ वर्षीय निर्माता म्हणाला, “मी माझ्या इच्छापत्रात तिच्यासाठी १० मिलियन डॉलर ठेवले आहेत. (भारतीय चलनानुसार ८१ कोटी ५१ लाख रुपये.) पण तिला याबाबत काहीच माहिती नाही. मी पहिल्यांदाच या गोष्टीचा खुलासा केला आहे.”
आणखी वाचा- “सुशांतने आत्महत्येआधी मला…”, अनुराग कश्यपला होतोय स्वतःच्या ‘त्या’ वागण्याचा पश्चाताप
रिपोर्ट्सनुसार जॉन आणि पामेला पहिल्यांदा १९८० मध्ये एकमेकांना डेट केलं होतं. त्यानंतर २० जानेवारी २०२० मध्ये या दोघांनी लग्न केल्याची माहिती समोर आली. पामेलाच्या पब्लिसिस्टनेही याची पुष्टी केली होती. मात्र या लग्नाच्या प्रमाणपत्रासाठी कायदेशीर कागदपत्र जमा करण्यात आली नव्हती. १ फेब्रुवारी २०२० रोजी पामेलाने घोषणा केली की तिने हे पेपरवर्क थांबवलं आहे. त्यानंतर काही दिवसांनी पामेलाने ट्विटर पेजवरून जॉनशी कायदेशीररित्या लग्न केलं नव्हतं असं स्पष्ट केलं. काही रिपोर्ट्सनुसार पामेला आणि जॉन फक्त ५ दिवस एकमेकांबरोबर होते. त्यानंतर जॉनने मेसेज करून पामेलाशी ब्रेकअप केलं होतं.
आणखी वाचा- ना कपाळी टिकली, ना गळ्यात मंगळसूत्र; नवी नवरी अथिया शेट्टीचं ‘ते’ वागणं पाहून भडकले नेटकरी
दरम्यान पामेला अँडरसन ‘बिग बॉस ४’मध्ये सहभागी झाली होती. पण ती या शोमध्ये केवळ ३ दिवसांसाठीच होती आणि त्यासाठी तिने बरीच मोठी रक्कम मानधन म्हणून घेतली होती. पामेलाने आधी टॉम लीबरोबर लग्न केलं होतं, त्यानंतर ती किड रॉकशी लग्नाच्या बेडीत अडकली होती. या दोघांनंतर तिने रिकी सॉलोमनशी दोन वेळा लग्न केलं. तर जॉन पीटर्सबरोबर हे तिचं पाचवं लग्न होतं. जॉन पीटर्स ‘बॅटमॅन’ चित्रपटाचे निर्माते आहेत.