राज्य शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या भारतरत्न पं.भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार २०१८ साठी ज्येष्ठ बासरी वादक पं. केशव गिंडे यांच्या नावाची घोषणा झाली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी मुंबईमध्ये केली. शास्त्रीय गायन व वादन या क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलाकाराला राज्य शासनातर्फे या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या पुरस्काराचे स्वरुप ५ लाख रुपये रोख, मानपत्र, सन्मानचिन्ह असे आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली उस्मान खान, सदानंद नायमपल्ली, शाम गुंडावार, श्रीमती भारती वैशंपायन, बाळ पुरोहित आणि शुभदा पराडकर या मान्यवरांच्या समितीने या पुरस्कारासाठी पं. गिंडे यांची शिफारस केली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यापूर्वी हा पुरस्कार गानसरस्वती किशोरी आमोणकर, पं.जसराज, श्रीमती प्रभा अत्रे, पं.राम नारायण, श्रीमती परवीन सुलताना आणि श्रीमती माणिक भिडे यांना प्रदान करण्यात आला आहे. पं.केशव गिंडे यांचा जन्म ५ सप्टेंबर, १९४२ साली पुणे येथे झाला. संगीतामध्ये त्यांनी पी.एच.डी केलेली आहे. त्यांनी बासरी वादनाचे शिक्षण गुरु स्व. पं. देवेंद्र मुर्डेश्वर, पं. हरिपद चौधरी यांच्याकडे घेतले. पं. गिंडे यांनी देशात आणि परदेशात आयोजित होणाऱ्या संगीत मैफिलीत तसेच आकाशवाणी आणि दूरदर्शनवरील कार्यक्रमात सहभाग घेतला आहे.

त्यांनी “केशव वेणू” या बासरीची निर्मिती केली आहे. या बासरीची नोंद “लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड” तसेच “गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड” मध्ये घेण्यात आली आहे. पं.केशव गिंडे यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. पं.केशव गिंडे हे अमुल्य ज्योती पब्लिक ट्रस्टचे अध्यक्ष असून संगीत आणि बासरीचा प्रचार-प्रसार-प्रबोधन, संशोधन व सवंर्धन याचे कार्य अनेक बासरी वादक शिष्यांच्या सहकार्याने करत आहे. गिंडे यांना भारत सरकारद्वारे सिनियर फेलोशिप, सहारा इंडिया यांच्याकडून जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविले आहे. ४ तपाहून अधिक काळात श्री.गिंडे यांच्याकडे हजारों विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले आहे. असंख्य परदेशी विद्यार्थ्यांनाही त्यांनी आपली बासरीची कला शिकवली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pandit bhimsen joshi lifetime achievement award 2018 announce to pandit keshav ginde by state government