स्वरस्वामिनी आशा भोसले या पुस्तकाचं प्रकाशन मुंबईतल्या विले-पार्ले या ठिकाणी करण्यात आलं. या कार्यक्रमात पंडीत हृदयनाथ मंगेशकर यांनी आशा भोसलेंच्या अनेक आठवणी सांगितल्या. तसंच खडतर बालपणही सांगितलं. आशा भोसले या सुरुवातीला इतर भावंडांप्रमाणे गात नसत. त्यांच्याविषयी मास्टर दीनानाथ मंगेशकर काय म्हणाले होते हेदेखील सांगितलं

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले हृदयनाथ मंगेशकर?

“पार्ल्यातल्या रंगमंचावर मी सर्वाधिक कार्यक्रम केले आहेत. मला या ठिकाणी काही हिंदी लोक वगैरे दिसत आहेत. पण त्यांना मराठी चांगलं कळतं त्यामुळे मी मराठीत बोलतो. आशाताई म्हणजेच आशा भोसले घरातली सगळी कामं करत असे. मला कडेवर घेऊन फिरत असे दमल्यावर घरी आली की आजीला विचारायची घरात खायला काय? आजी सांगायची तिखट, तेल आणि भाकरी. आज तुम्हाला मी हे सांगू इच्छितो की अनेक वर्षे आमचं हेच अन्न होतं. भाकरी, भाजी, वरण-भात ते आम्हाल माहीत नव्हतं.”

हे पण वाचा- Video : आशा भोसलेंच्या ४० वर्षे जुन्या गाण्यावर माधुरी दीक्षितच्या मनमोहक अदा, मराठी अभिनेत्रींनी केल्या खास कमेंट्स

दीदी आणि मीनाताई मुंबईत होत्या आशाताई घरी

“आमच्या घरात दीदी (लता मंगेशकर) मुंबईत काम करत होती. तिच्यासह मीनाताई (मीना खडीकर) गेली होती. मी उषाताई आणि आशाताई आम्ही खेड्यात होतो. दुसरं महायुद्ध सुरु होतं. आम्हाला अन्नही नीट मिळत नव्हतं. तेल,तिखट आणि भाकरी असं खाऊन राहायचो. एक दिवस असंच झालं आशाताईने तेल, तिखट आणि भाकरी खाल्ली त्यानंतर आमच्या ताईने (आमची आजी) आशाताईला सांगितलं, आशा गायला ये. गाणं सुरु झालं जे गाणं आपण जैत रे जैत मध्ये ऐकलं आहे, १९४२ मध्ये ते गाणं आशाताई गात होती. आशाताई खूप गायली. मेरा छल्ला गुम गया असं काहीतरी गाणं होतं ते ती गायली. ते गाणं मी मराठीत जैत रे जैत रे जैतमध्ये दिलं. ते गाणंही आशाताईनेच गायलं.”

लहानपणी मला आशाताई कडेवर घेऊनच सगळी काम करीत असे

आशाताई पहिल्यापासून सुदृढ. मी एका पायाने अगदी लहान असल्यापासून अधू आहे. उषाताई माझ्यापेक्षा एक वर्षाने मोठी गायची, मीनाताई दीदीबरोबर. मी आणि उषाताई लहान होतो. त्यामुळे घरातली सगळी कामं आशाताईला (आशा भोसले) करावी लागत.भांडी घासणं, धुणी धुणं, स्वयंपाक करणं ही सगळी कामं तिला करावी लागत होती. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला कडेवर घेऊनच ती वावरायची, मला हिंडवून आणायची, खेळवायची, माझं संगोपन सगळं आशाताईने केलं आहे. असं काही ऋण असतं ते फेडता येत नाही. मी आशाताईच्या ऋणात आहे, ती नऊ वर्षांची होती तेव्हापासून तिने मला सांभाळलं आहे.”

मास्टर दीनानाथ काय म्हणाले होते आशाताईंबाबत?

“लतादीदी आणि मीनाताई या आमच्या वडिलांसमोर (मास्टर दीनानाथ मंगेशकर) गात असायच्या. त्यावेळी आशाताई खेळत असायची. एक दिवस आईने बाबांना चिंतेने विचारलं ही सगळी मुलं गात आहेत, आशा गात नाही. त्यावर बाबांनी असं उत्तर दिलं, ‘ही हब आहे. हब म्हणजे म्हैस. ही भोळी आहे पण कुणी अंगावर आलं ती शिंगावर घेणारी आहे. ती बंदिशी पाठ करत नाही, गाणं शिकत नाही. पण ही सगळं आतल्या आत पाठ करते आहे, मनन आणि चिंतन करते आहे. एक वेळ अशी येईल ही कुणाला न सांगता ती एकदम वर येईल आणि गायला लागेल.’ माझ्या आईने हा किस्सा मला सांगितलं. आशाताई तेव्हा गात नव्हती. आम्ही सगळे गायचो. पुण्यात, कोल्हापूरला गाणं ऐकलं नाही. मुंबईत ऐकलं नाही. एक दिवस अचानक मी ऐकलं आशा भोसले मोठी गायिका झाली आहे. तो जो काळ होता ती मला भेटलीच नाही. जगातलं हे एक आश्चर्यच म्हणावं लागेल. ज्या भावाला घेऊन जी मुलगी (आशाताई) कबड्डी, हुतूतू खेळली आहे ते सगळं करुन तिने मला कधी काही सांगितलंच नाही की मी गाते. आशा भोसले हे नाव मी एकदमच ऐकलं.” असा किस्सा हृदयनाथ मंगेशकरांनी सांगितला.

शांताबाईंना शब्द लिहायला सांगितले तो किस्सा

पुढे ते म्हणाले, “आशाताई खूप मोठी गायिका आहेच. खूप दिवस गेले मी संगीत देऊ लागलो. एक गाणं केलं. मला अट घालण्यात की वादक न घेता गाणं करायचं आहे. मला बाबांची एक बंदिश आठवली हुं जो गयी ही ती बंदिश होती. मला माहीत होतं हे गाणं अतिशय लोकप्रिय होईल. मी शांता शेळकेंकडे गेलो. त्यांना म्हटलं मला गाणं लिहून द्या. त्या म्हणाल्या आधी कपडे घालायचे आणि मग माप द्यायचं असं मी करत नाही, म्हणजेच आधी चाल आणि मग शब्द असं मी करणार नाही. मी त्यांना सांगितलं जे तुम्ही म्हणत आहात करणार नाही ते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी केलं होतं. माझ्या वडिलांनी त्यांना चाल दिली तेव्हा सावरकर म्हणाले मी चालीवर लिहित नसतो. माझे वडील म्हणजेच मास्टर दीनानाथ त्यांना म्हणाले तुम्ही हा प्रयोग कराच. त्यांनी जे गाणं लिहिलं ते गाणं होतं शतजन्म शोधताना शत आर्ती व्यर्थ झाल्या. मी हे उदाहरण दिल्यानंतर शांता शेळकेंना ते पटलं त्यांनी गाणं लिहिलं जिवलगा राहिले दूर घर माझे. हे एकमेव मराठी गाणं असं आहे ज्यात वादक नाहीत. त्यात फक्त आशाताई गाणं गायलं आहे. वादक मी होतो, मी तंबोरा वाजवला आहे. विष्णु नावाचा मुलगा होता त्याने तबला वाजवला बाकी ते सगळं गाणं आशाताईने अजरामर केलं. जिवलगा या गाण्याचे जे बोल आहेत अगदी तसंच आशाताई जगत आली आहे. मी जर आशाताईच्या हाल अपेष्टा सांगितल्या तर रात्र सरेल. जे हाल तिने भोगले ती वेदना तिच्या गाण्यांतून उमटते. मला तिने तेव्हा प्रश्न केला होता की प्रयोग करतोस तेव्हा माझी आठवण का येते? त्यावर तुझे आणि माझे अनुभव एकच आहेत. कारण मी तुझ्या कडेवर बसून मोठा झालोय. तू जे अनुभव घेतलेस ते मी पाहिले आहेत. त्यामुळे मी प्रयोग करतो. त्यामुळे जिवलगा गाणं तिने गायलं आणि अजरामर झालं. मी आज आशाताईला पुन्हा विनंती करतो मी जिवलगा सारख्या चाली केल्या तर तिने त्या गाव्यात. म्हणजे गंमत अशी असेल की ८८ वर्षांचा संगीत दिग्दर्शक आणि ९० वर्षांची गायिका असा खास योग जुळून येईल” असंही हृदयनाथ मंगेशकर म्हणाले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pandit hridaynath mangeshkar told the story what his father said about asha bhosle scj
First published on: 28-06-2024 at 13:32 IST