अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही मराठी चित्रपटसृष्टीतली लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सोनालीचा नुकताच पांडू हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात पहिल्यांदाच आपल्याला सोनालीसोबत भाऊ कदम आणि कुशल बद्रीक दिसले. आता त्यांचा चित्रपट हा प्रदर्शित झाल्यापासून त्याला प्रेक्षकांचे प्रेम मिळाले आहे. दरम्यान, चित्रपटाचे दिग्दर्शक विजू माने यांनी सोनालीसाठी एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
विजू यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी सोनालीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत “या पोस्टमध्ये पांडूच्या कास्टिंग बद्दल चर्चा सुरू असताना अचानक अश्विन पाटीलने तिचे नाव सुचवलं. अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर तिचं नाव येताक्षणी मी हंड्रेड पर्सेंट कन्व्हिन्स्ड नव्हतो. पण झी स्टुडीओचे सर्वेसर्वा मंगेश कुलकर्णी आणि अश्विन यांनी मला पटवून दिलं. मी कन्व्हीन्स नसण्याचं कारण मला स्टार पदाला पोहोचलेल्या नट्यांचे नखरे आवडत नाहीत. चित्रपटातल्या भूमिकेपेक्षा यांच्या स्वभावावर अधिक बोललं जातं. सगळ्या पर्यायांमधून शेवटी एकदाचं तिचं कास्टिंग झालं, चित्रपट झाला आणि ही पोरगी आपली एकदम झक्कास मैत्रीण झालं”, असे विनू म्हणाले.
विनू पुढे सोनालीची स्तुती करत म्हणाले, “खरंच स्टारपद असलेल्या हीरोइन बद्दल बऱ्या-वाईट चर्चा कायमच होत असतात. तो त्यांच्या आयुष्याचा एक भाग आहे. पण मी सोनालीबद्दल का कोण जाणे थोडं वाईटच असं ऐकून होतो. सेटवर खूप त्रास देते, दिग्दर्शकाला स्वतःच्या सूचना देते. पहिला दिवस शूटिंगचा येईपर्यंत मला सतत असं वाटायचं, की माझ्या आणि तिच्यात सेटवर खटके उडणार. पण मला आश्चर्य झालं की सेट वरच्या पहिल्या शॉट पासून ते प्रमोशन च्या शेवटच्या दिवसापर्यंत आमच्यात वादाचा असा मुद्दाच आला नाही. मुळात ती माझ्या अपेक्षेपेक्षा अत्यंत वेगळी होती. सेटवर कधीही एक सेकंद देखील उशिरा पोहोचली नाही. उलट दिलेल्या वेळेच्या पंधरा मिनिटे तरी आधी ती कुठेही हजर असते. मग ती मीटिंग असो, शिबिर असो, फोटोसेशन असो, डान्स असो, किंवा शूटिंग असो. आपण सेटवर असताना इतर कुठल्याही गप्पा न मारता, केवळ आपल्या चित्रपटातील भूमिकेविषयी गप्पा मारायची.”
पुढे विजू म्हणाले, “सोनालीने या चित्रपटातील तिच्या भूमिकेच्या स्टाइलिंगमध्ये खूप मेहनत घेतली. तिच्या नाकातल्या पासून तिच्या साडीपर्यंत एवढचं काय तर कधी तिने स्वत: चे कपडे सुद्धा या चित्रपटात वापरले. तिच्या आणखी एका गोष्टीचं फार अप्रूप वाटतं, ते म्हणजे प्रोफेशनलिझम.”