छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका ‘पंड्या स्टोअर’मध्ये काम करणारी अभिनेत्री सिमरन बुद्धरुप सध्या चर्चेत आहे. या चर्चा सिमरनने तिला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचे सांगितल्यामुळे सुरु झाल्या आहेत. विशेष म्हणजे धमकी देणारे हे तरुण असल्याचे तिने सांगितले आहे. आता तिने यावर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. पण सिमरनला जीवे मारण्याच्या धमक्या का दिल्या जात आहेत? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
सिमरन ही पंड्या स्टोअर मालिकेत एक निगेटिव्ह भूमिका साकारताना दिसत आहे. या भूमिकेमुळे तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जाते. सिमरनने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही स्क्रीनशॉट आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. हे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तिने, ‘असे पहिल्यांदाच झालेले नाही की मी ट्रोल झाले आहे. मला आजही आठवते जेव्हा मी निगेटिव्ह भूमिका साकारली तेव्हा लोक माझ्याविषयी फार वाईट बोलत होते. मला अपशब्द वापरत मेसेज करत होते. मी त्यावेळी या गोष्टीचे वाईट वाटून घेतले नाही आणि विचार केला की हे केवळ त्यांना माझी भूमिका आवडत नसल्यामुळे सुरु झाले आहे. पण त्यांच्या धमक्या येणे बंद झालेले नाही’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.
PHOTOS: १५० एकर क्षेत्र, तीन बंगले अन्…; सलमानच्या पनवेलमधील फार्महाऊसची किंमत कितीय माहितीये का?
सिमरनने तिला तरुण मुले फार त्रास देत असल्याचे सांगितले. सोशल मीडियावर तिला धमकी देत तसेच शिवीगाळ करत मेसेज करत असल्याचे तिने सांगितले आहे. सिमरने तिच्या इन्स्टाग्रामवरुन धमकी देणाऱ्या मुलीला लाइव्हमध्ये जॉइन केले होते. तिला सगळ्यांसमोर चेहरा दाखवण्यास सांगितले होते. ‘माझ्या विषयी वाईट लिहिणाऱ्यांमध्ये हिंमत देखील नाही. मुली शाळा बंद आहेत तर अशा प्रकारचा टाइम पास करण्याची गरज नाही. हिंमत असेल तर समोर येऊन बोल. हा हा ठिक आहे तू इतकच बोलू शकते. लाइव्ह ये आणि माझ्याशी बोल’, असे सिमरने म्हणते. तसेच शिवीगाळ करणाऱ्या मुलीचा आवाज ऐकून सिमरन शेजारी असणाऱ्या व्यक्तीला ‘अगं ही तर शाळेतील मुलगी आहे’ असे बोलताना दिसत आहे. हे व्हिडीओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये धमकी देणाऱ्या आणि अपशब्द वापरणाऱ्या लोकांना ती सायबर क्राइमच्या मदतीने लवकरात लवकर शोधून काढणार असल्याचे तिने म्हटले आहे.
सिमरनने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. त्यामध्ये नजर, परवरिश, दुर्गा माता की छाया अशा अनेक मालिकांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वीच सिमरनची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. तिच्यासोबत काम करणारे तिचे कोस्टार ऐलिस कौशिक, अक्षय खरोडिया आणि मोहित परमार यांची देखील करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती.