कॉलेजच्या कट्टय़ावर भंकस करताना मित्रामित्रांमध्ये अनेकदा भन्नाट पैजा लागतात. यात जास्तीत जास्त वडापाव किंवा पाणीपुरी कोण खाऊ शकतो, या पैजेचा नेहमीच समावेश असतो. मग पावले आपोआप जवळच्या पाणीपुरीवाल्याच्या ठेल्याकडे किंवा वडापावच्या गाडीकडे वळतात. पैज लावलेले दोघे वडापाव किंवा पाणीपुरीवर तुटून पडतात आणि आजूबाजूचे लोक मोजदाद करू लागतात. कॉलेजच्या कट्टय़ावर हमखास दिसणारे हे दृष्य ‘रांजना’च्या सेटवर दिसले. मात्र येथे पैज लागली होती ती थेट सोनम कपूर आणि धनुष या दोघांमध्ये! विशेष म्हणजे ही पैज सोनमने जिंकली. तिने एका बैठकीत ३५ पाणीपुऱ्या उडवल्या आणि धनुषला थक्क केले.
‘रांझना’च्या चित्रिकरणादरम्यान एका प्रसंगात सोनम आणि धनुष दोघेही पाणीपुरी खात असल्याचे दृष्य होते. हे दृष्य चित्रीत करताना सोनमच्या तोंडाला पाणीच सुटले होते. लहानपणापासून खादाड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनमने चक्क धनुषला पाणीपुरीच्या स्पर्धेचे आव्हान दिले. धनुषनेही मग आढेवेढे न घेता सोनमची ही पैज स्वीकारली.
या दोघांमध्ये पैज लागल्याचे वृत्त लगेच सेटवर पसरले आणि सगळ्यांनीच दोघांभोवती गर्दी केली. पण शेवटी ३० पाणीपुऱ्या खाल्ल्यानंतर धनुषने हाय खाल्ली. पण सोनम तीसच्याही पुढे जात ३५ पाणीपुऱ्यांवर जाऊन थांबली. मात्र या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी चित्रिकरण रद्द झाले की नाही, हे कळायला मार्ग नाही.

Story img Loader