सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चा आहे ही अॅमेझॉन प्राइमच्या ‘मिर्झापूर’ या वेबसिरीजची. या वेबसिरीजमधून पुन्हा एकदा अभिनेता पंकज त्रिपाठी यांनी आपल्या अभिनयाचे नाणे खणखणीत वाजवले आहे. मिर्झापूरवर राज्य करणारा अखंडानंद म्हणजेच ‘कालिन भय्या’ ही पंकज यांनी साकारणारी भूमिका अनेकांना आवडली आहे. मागील चौदा वर्षांपासून अभिनय क्षेत्रात असणाऱ्या पंकज यांना खऱ्या अर्थान लोकप्रियता मिळाली ती २०१२ साली प्रदर्शित झालेल्या अनुराग कश्यपच्या ‘गँग्स ऑफ वासेपूर’मुळे. या सिनेमानंतर पंकज यांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही. एकमागोमाग एक दर्जेदार भूमिका साकारणारे पंकज आता ‘स्त्री’ आणि ‘मिर्झापूर’सारख्या वेबसिरीजमुळे चर्चेत आहेत. त्यामुळेच आता पंकज यांची ‘सेक्रेड गेम्स’च्या दुसऱ्या पर्वामध्ये किती मोठी भूमिका असेल याकडे नेटकऱ्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे. ‘सिक्रेड गेम्स’च्या पहिल्या पर्वात अगदी मोजक्याच दृष्यांमध्ये गुरुजीची पात्र साकारणाऱ्या पंकज यांनी दुसऱ्या पर्वात हे पात्र महत्वाची भूमिका बजावेल असा अप्रत्यक्ष इशाराच दिला आहे.

‘सेक्रेड गेम्स’च्या दुसऱ्या पर्वातील भूमिकेबद्दल बोलताना पंकज म्हणतात, ‘पुढील पर्वामध्ये माझे पात्र हे महत्वाच्या पात्रांपैकी आहे की नाही याबद्दल मला कल्पना नाही. काही दिवसांपूर्वीच मला फोन आला आणि मी वरुण ग्रोव्हर (‘सेक्रेड गेम्स’चे लेखक) यांना भेटावे असे मला सांगण्यात आले. आमच्या शेड्युलनुसार दुसऱ्या भागाच्या चित्रिकरणाचे नियोजन करणयात येणार आहे. त्यामुळेच आता या भेटीनंतर पुढील आठवड्यापर्यंत आमच्या भूमिकेबद्दलची अधिक स्पष्टता आम्हाला येईल.’

दुसऱ्या भागामध्ये गुरुजी या भूमिकेची व्याप्ती किती असेल याबद्दल बोलताना या भूमिकेभोवतीचे रहस्य कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता अशी माहिती पंकज यांनी दिली. माझ्या भूमिकेबद्दल सर्व माहिती राखून ठेवण्यात आली होती. ‘सेक्रेड गेम्स’चे पहिल्या पर्वाचे चित्रिकरण झाल्यानंतर अवघ्या एका दिवसात मी माझ्या भूमिकेसाठीचे चित्रिकरण पूर्ण केले होते. त्यानंतर अखेरच्या क्षणी पर्वाच्या शेवटाकडे जाताना या भूमिकेचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. चित्रिकरणादम्यान चित्रित करण्यात आलेली दृष्ये नक्की कुठे वापरण्यात येणार याबद्दल मला कल्पना देण्यात आली नव्हती. आणि मीही त्याबद्दल जास्त चौकशी केली नाही. तसेच त्या भूमिकेचा स्क्रीन टाइम अगदीच कमी असल्याने पहिल्या पर्वातील मुख्य भूमिका म्हणून आम्ही त्याचा प्रमोशनमध्ये वापर केला नाही असे पंकज यांनी सांगितले. यावरूनच त्यांची पुढील पर्वातील भूमिका महत्वाची असेल असे म्हणायला हरकत नाही.