पंकज त्रिपाठी हे नाव आता बॉलिवूडमध्ये परिचयाचं झालं आहे. ‘मसान’पासून ‘मिर्झापूर’पर्यंत अनेक चित्रपटांमध्ये पंकजने त्याच्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर सोडली आहे. मूळचा बिहारचा असलेल्या पंकजचा हा प्रवास काही सोपा नव्हता. त्याला हे यश सहजासहजी मिळालेलं नाही. बरीच मेहनत आणि स्ट्रगल केल्यानंतर पंकजने नुकतंच स्वत:चं घर विकत घेतलं. मड आयलंड इथं त्याने घर घेतलं. पण स्ट्रगलिंगच्या काळातील दिवस आपण विसरलो नसल्याचं तो सांगतो.
‘माझी पत्नी मृदुला आणि मी मिळून आमच्या स्वप्नांचं घर विकत घेतलं. पण मी पाटणा इथलं पत्र्याचं छप्पर असलेलं घर अजूनही विसरलेलो नाही. एका रात्री, पाऊस आणि वादळी वाऱ्याने घराचं छप्पर उडालं होतं. आकाशाकडे तसंच पाहात मी उभा होतो,’ अशी आठवण पंकजने सांगितली.
पंकज आणि त्याची पत्नी नवीन घरात राहायला गेले आहेत. ‘हे आमचं स्वप्नांचं घर आहे. समुद्राकाठी आपलं घर असावं हे आमचं स्वप्न होतं. अखेर मड आयलंडमध्ये मी हे घर विकत घेण्यात यशस्वी ठरलो. नवीन घरात राहायला गेलो तेव्हा माझी पत्नी फार भावूक झाली होती,’ असं त्याने सांगितलं.
वर्षभरापूर्वी मला जी भूमिका मिळेल त्याला मी होकार देत होतो पण आता विचारपूर्वक मी भूमिकांची निवड करू लागलो आहे, असं तो सांगतो. ‘क्रिमिनल जस्टीस’, ‘मिर्झापूर’, ‘मसान’, ‘स्त्री’ या चित्रपटांमधील पंकज त्रिपाठीच्या भूमिकांचं प्रेक्षक-समीक्षकांनी भरभरून कौतुक केलं.