आयुष्याची सुरुवात करताना अनेक चढउतार येत असतात. मात्र प्रयत्न केल्यावर यशाची उंची गाठता येते हे गायक पंकज उधास यांनी दाखवून दिले. गेली ३२ वर्षे पंकज उधास यांनी आपल्या सुरेल आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे. आजही त्यांनी गायलेल्या ‘नाम’ चित्रपटातील ‘चिठ्ठी आई है’ या गाण्याची लोकप्रियता कायम आहे. १९८६ पासून आतापर्यत म्हणजे २०१८ पर्यंत त्यांची गाणी आवडीने ऐकली जातात. मात्र आज लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या या गायकाला पहिल्यांदा प्रेक्षकांकडून मिळालेली दादा ही फार वेगळ्या अंदाजात होती. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जीवनातील अशाच काही गोष्ट समोर आल्या आहेत.
१. लोकप्रिय गायकांपैकी अग्रस्थानावर असलेल्या पंकज उधास यांना त्यांच्या गायकीसाठी प्रेक्षकांकडून खास बक्षीस देण्यात आलं होतं. पंकज यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच एका कार्यक्रमामध्ये गायिका लतादीदी यांनी गायलेले ‘ऐ मेरे वतन के लोगों’ हे गाणे गायले होते. पंकज यांनी हे गाणे उत्तमरित्या गायल्यामुळे त्यांना प्रेक्षकांनी ५१ रुपये बक्षीस म्हणून दिले होते.
२. पंकज उधास यांचा जन्म १७ मे १९५१ रोजी गुजरातमध्ये झाला. आपल्या कारकिर्दीची सुरुवात करत असतानाच त्यांनी उर्दु भाषेचा अभ्यास केला होता. यानंतर त्यांनी ‘गझल’ या गायन प्रकाराकडे वाटचाल केली. १९७१ साली त्यांना पहिल्यांदा ‘कर्मा’ या चित्रपटामध्ये पार्श्वगायन करण्याची संधी मिळाली. मात्र त्यांच्या गाण्याची विशेष दखल घेण्यात आली नाही.
३. ‘कर्मा’ चित्रपटातील गाण्याची विशेष दखल न घेतल्यामुळे ते कॅनडाला रवाना झाले तिथे त्यांनी लहान-मोठ्या समारंभामध्ये गाण्यास सुरुवात केली. कॅनडामध्ये लोकप्रियता मिळाल्यानंतर त्यांनी भारतात येण्याचा निर्णय घेतला. मात्र तरीदेखील पंकज उधास यांना कारकिर्दीच्या सुरुवातीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. या काळात किशोर कुमार आणि मोहम्मद रफी यांसारखे प्रसिद्ध गायक असल्यामुळे पंकज यांना १९७९ पर्यंत त्यांना खडतर प्रवास करावा लागला.
४. स्वत: ची कारकिर्द घडवत असतानाच त्यांना ‘जबाव’ या चित्रपटातील ‘मितवा रे मितवा’ या गाण्यासाठी पार्श्वगायन करण्याची संधी मिळाली. पंकज यांनी या संधीचे सोन करत आपल्या यशाच्या पाय-या चढण्यास सुरुवात केली. या गाण्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. हे गाणं त्या काळी विशेष लोकप्रिय ठरले.
५. ‘मितवा रे मितवा’ने लोकप्रियता मिळविल्यानंतर आपण ‘गझल’ या गायन क्षेत्रात करिअर घडवू शकतो ही जाणीव पंकज यांना झाली. त्यानंतर त्यांनी ‘चिठ्ठी आई है’ हे सुपरहिट गाणं गायले. यानंतर त्यांनी स्वत: ला पूर्णपणे ‘गझल’ या गायन प्रकाराकडे झोकून दिलं. या गाण्यानंतर त्यांना ‘घायल’, ‘साजन’, ‘ये दिल्लगी’, ‘फिर तेरी कहानी याद आई’ आणि ‘मोहरा’ यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये पार्श्वगायनाची संधी मिळाली.
दरम्यान, १९८० मध्ये त्यांच्या गाण्याचा पहिला अल्बम आला होता. त्यानंतर त्यांच्या गाण्यांच्या अल्बमचा धडाका सुरु झाला. १९८१ साली ‘मुकर्रर’, १९८२ साली ‘तरन्नुम’, १९८३ साली ‘महफिल’, तर १९८५ साली ‘नायाब’ हे त्यांचे काही अल्बम आले. अल्बममधील गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविण्यास सुरुवात केली.