अभिनेत्री परिणीती चोप्राची मुख्य भूमिका असलेला ‘सायना’ या बायोपिकचा टीझर नुकताच रिलीज झालाय. सायना नेहवालचा जीवनप्रवास या सिनेमातून मांडण्यात आलायं. या टीझरमधून परिणीतीचा लूक सायना नेहवालशी फारसा मिळता जुळता नाही. परिणीतीच्या गालावर दाखवण्यात आलेला तीळ हेच एक साम्य आढळून येतं. मात्र बॅडमिंटनच्या कोर्टात दाखवण्यात आलेली तिच्या खेळाची झलक सायनाच्या स्पर्धांची नक्कीच आठवण करुन देते. या टीझरमधूनच परिणीतीने सायनाची भूमिका चोख निभावल्याचं दिसून येतंय.
परिणीतीच्या आवाजात या टीझरची सुरुवात होते. काही भारतीय घरांमध्ये होणारा मुला-मुलींमधील भेदभावाबद्दल ती सांगतेय. “मुलींना घरकामं शिकवली जातात तर मुलांना मात्र शिक्षण दिलं जातं. मुलगी अठरा वर्षांची झाली की तिचं लग्न लावून दिलं जात.माझ्या बाबतीत मात्र असं घडलं नाही.” असं ती या टीझरच्या सुरूवातीला सांगतेय.
View this post on Instagram
त्यानंतर बॅडमिंटन कोर्टात परिणीतीने साकारलेली सायना तिच्या जबरदस्त खेळाने कश्याप्रकारे वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये बाजी मारते याची एक झलक पाहायला मिळते. त्यामुळे या सिनेमाविषयी सायनाच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झालीय. याशिवाय बॉलिवूडमधील कोणत्याही बायोपिकमध्ये पाहायला मिळतो तसा थोडा ड्रामा, थोडा मसाला ‘सायना’मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळू शकतो.
तर या भूमिकेसाठी परिणीतीने मोठी मेहनत घेतली आहे. परिणीतीने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर फोटो अपलोड केले होते. यात तिने सकाळी 5 वाजताच ती दिवसाची सुरुवात करत असल्याचं म्हंटलं होतं. वर्कआउट करुन सकाळी 6 वाजताच ती सराव सुरु करत होती. असं म्हंटलं आहे. अमोल गुप्ते दिग्दर्शित सायना हा सिनेमा 26 मार्चला प्रदर्शित होणार आहे. 2012 सालच्या ऑलिंपीक स्पर्धांमध्ये सायना नेहवालने कांस्य पदक पटकावलं आहे. तसचं आपल्या उत्कृष्ट खेळाने अनेक स्पर्धांमध्ये बाजी मारली आणि अनेक नवे विक्रम तिने गाठले आहेत. सायनाच्या याच कामगिरीची झलक या सिनेमात पाहायला मिळणार आहे.