कोणतीही भूमिका असो त्या भूमिकेत आपल्या अभिनयाने ‘जान’ ओतण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणारे ‘ऑल टाइम फेवरिट’ म्हणता येतील असे अभिनेते परेश रावल आणि नासिरुद्दिन शाह आणि त्यांना साथ देणार आहेत अनू कपूर. हे त्रिकुट प्रथमच ‘धरम संकट में’ या सामाजिक उपहासात्मक सिनेमात एकत्र येणार आहेत.
‘धरम संकट में’ या एप्रिलमध्ये प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाच्या शीर्षकावरून आणि आता पोस्टर प्रदर्शनावरूनच परेश रावलच्या गाजलेल्या ‘ओ माय गॉड’च्या यशाची पाश्र्वभूमी या चित्रपटाला आहे हे सहज समजून येईल. धरम पाल असे परेश रावलच्या व्यक्तिरेखेचे असून नासिरुद्दिन शाह एका हिंदू बाबाची भूमिका साकारणार आहेत, तर अनू कपूर एका मुस्लीम बाबाच्या भूमिकेत दिसणार आहेत, असा कयास पोस्टरवरून करता येईल.
एखादा विषय सुपरहिट ठरला आणि प्रेक्षकांनी त्या विषयावरचा सिनेमा उचलून धरला की नेहमी एका यशस्वी फॉम्र्युलाच्या शोधात असलेले बॉलीवूडवाले त्याच विषयावरचा सिनेमा थोडेफार कथानक बदलून पुन्हा नवीन सिनेमा बनविण्याचा प्रयत्न करतात. ईश्वरालाच कोर्टात खेचण्याचा मामला गाजणार नक्कीच. या मुद्दय़ामुळेच ‘ओ माय गॉड’ सुपरहिट ठरला होता. आगामी ‘धरम संकट में’ या चित्रपटात धरम ही प्रमुख भूमिका परेश रावल साकारत असून धरम संकटात आहे किंवा धर्म संकटात आहे अशा दोन अर्थानी चित्रपटकर्त्यांनी शीर्षक तयार केले आहे. धरम या व्यक्तिरेखेचा अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो आणि त्यातून तो कुणाकुणाची कशी मदत घेऊन उत्तरे शोधतो हा विषय या चित्रपटात मांडण्यात येणार असून लोकप्रिय कलावंतांना घेऊन विनोद- उपहास- सामाजिक भाष्य वगैरे करण्याचा प्रयत्नही हा सिनेमा करील, असा चित्रपटकर्त्यांचा होरा दिसतोय.
‘ओ माय गॉड’नंतर अलीकडेच गाजलेला आमिर खानच्या प्रमुख भूमिकेतील ‘पीके’ या सिनेमातही देव-अस्तित्व-धर्म अशा भारतीय समाजात नेहमी चर्चेत राहिलेल्या परंतु जाहीरपणे चर्चा केली जात नाही अशा विषयावरचा सिनेमा आला होता. आता धरम नावाच्या हिंदू म्हणून वाढलेल्या परंतु मुळात मुस्लीम असलेल्या व्यक्तीच्या खऱ्या वडिलांचा शोध घेण्याचा प्रयत्न आणि ही गोष्ट सांगताना त्याद्वारे सामाजिक उपहास, भाष्य करण्याचा प्रयत्न ‘धरम संकट में’ या चित्रपटाद्वारे केला जाणार आहे. सिनेमा माध्यमाचा संदेश देण्यासाठी उपयोग करण्याबरोबरच लोकप्रिय आणि पूर्णपणे व्यावसायिक पद्धतीच्या वेष्टनात हा संदेश बसवून प्रेक्षकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न राजकुमार हिरानी यांनी यशस्वीरित्या केला असून फवाद खान दिग्दर्शित या सिनेमाद्वारे पुन्हा एकदा केला जाणार आहे, असे म्हणायला हरकत नाही. हिंदू आणि मुस्लीम अशा दोन्ही धर्मातील व्यक्तिरेखा दाखविल्यामुळे हा सिनेमा अनेक वादांच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यताही नाकारता येत नाही, असे मत बॉलीवूडवाले खासगीत व्यक्त करीत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा