गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर चरित्रपट साकारला जातो आहे या बातमीने सर्वाचे लक्ष वेधून घेतले होते. मात्र, नरेंद्र मोदींची भूमिका करणार कोण?, हा प्रश्न सर्वाना पडला होता. आता या प्रश्नाचे उत्तर मिळाले असून गुजराती रंगभूमी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात गाजलेला अभिनेता परेश रावल यांची या भूमिकेसाठी निवड झाली असल्याचे समजते. परेश रावल भूमिका करण्याबरोबरच चित्रपटाची सहनिर्मितीही करणार आहेत.
मूळचे बडोद्याचे असणारे पण, अनिवासी भारतीय मितेश पटेल यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर चित्रपट काढायची इच्छा व्यक्त केली होती. मोदींनी गुजरातमध्ये जो बदल घडवून आणला त्यामुळे आपण प्रभावित झाल्यानेच एका चहावाल्यापासून मुख्यमंत्री पदापर्यंतचा प्रवास चित्रपटातून मांडावा, असा विचार मनात असल्याचे पटेल यांनी सांगितले होते. ४० कोटी रुपये बजेटमध्ये हा चित्रपट बनवण्यात येणार आहे. मात्र, पटेल यांना मोदींची भेट घेता आली नव्हती त्यामुळे त्यांचे काम थांबले होते. गेल्या आठवडय़ात पटेल यांनी गांधीनगरमध्ये मोदींची भेट घेतली. त्यांना चित्रपटामागचा हेतू सांगितला. मोदींनी त्यांना चित्रपट करण्यासाठी होकार दिल्यानंतर लगेचच चित्रपटाचे काम सुरू करण्यात आल्याचे पटेल यांनी म्हटले आहे.
मोदींच्या भूमिकेसाठी परेश रावल यांची निवड निश्चित होती. परेश रावल हे मोदींचे परिचित आहेत. परेश रावल यांनी २०१२ मध्ये गुजरात निवडणूकीसाठी मोदी यांच्या प्रचारसभेतही सहभाग घेतला होता. त्यामुळे परेश रावल यांच्याशिवाय दुसरा कोणताही अभिनेता मोदींची भूमिका चांगली वठवू शकणार नाही, असे वाटल्यानेच त्यांची या भूमिकेसाठी निवड झाल्याचे पटेल यांनी सांगितले. अभिनयाबरोबरच चित्रपटाच्या निर्मितीचाही थोडा भार परेश रावल उचलणार असल्याचे समजते.

Story img Loader