भारतीय हवाई दलाने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यानंतर भाजपाचे खासदार आणि अभिनेते परेश रावल यांनी पाकिस्तानी कलाकार अली जफरला टोला लगावला आहे. आता बोलती बंद झाली का, असं म्हणत त्यांनी पाकिस्तानी कलाकारांवर निशाणा साधला आहे. भारतीय हवाई दलाने मंगळवारी पहाटे पावणेचार वाजता पाकिस्तानातील बालाकोट येथील जाभामधील जैश-ए-महम्मदच्या तळावर हवाई हल्ले करीत ते तळ उद्ध्वस्त केले. पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४१ जवान ‘जैश-ए-महम्मद’च्या भीषण हल्ल्यात शहीद झाल्याच्या १२व्या दिवशी झालेल्या या दमदार कारवाईचे देशवासियांनी जल्लोषात स्वागत केले आहे.
पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानी गायक आणि अभिनेता अली जफरने ट्विट केले होते. हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या भाषणाची स्तुती करत त्याने हे ट्विट केले होते. आता भारतीय हवाई दलाने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यानंतर परेश रावल यांनी अलीच्या त्याच ट्विटवरून ‘आता नि:शब्द’ असा टोला लगावला.
Now speechless!!! https://t.co/cY8RrkfAgh
— Paresh Rawal (@SirPareshRawal) February 26, 2019
भारतीय हवाई दलाच्या मिराज विमानांनी अवघ्या दीड मिनिटांत कारवाई पार पाडली होती. अद्ययावर केलेल्या ‘मिराज- २०००’ जातीच्या डझनभर विमानांनी ही कारवाई पार पाडली आणि त्यांना चार सुखोई विमानांचे कवच लाभले होते. बॉलिवूडनंही भारतीय वायूसेनेचं कौतुक केलं आहे. तसेच पंतप्रधान मोदींचेही आभार ट्विटवर मानले आहे. ही खऱ्या अर्थानं चांगली सकाळ होती, अशा शब्दात परेश रावल यांनी आनंद व्यक्त केला होता.