बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अटक झाली आहे. तो सध्या मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये कैद आहे. २ ऑक्टोबर रोजी कॉर्डेलिया क्रूझ ड्रग पार्टीच्या छाप्यात आर्यन खानला ताब्यात घेण्यात आले. तर अद्याप आर्यनला जामीन मंजूर न झाल्याने २० ऑक्टोबरला होणाऱ्या पुढील सुनावणीपर्यंत त्याला तुरुंगातच राहवे लागणार आहे. दरम्यान, या प्रकरणावर अनेक बॉलिवूड कलाकार प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. आता अभिनेते परेश रावल यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
परेश रावल यांनी नुकतीच नवभारत टाइम्सला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये त्यांना ‘तुम्ही दोन तरुण मुलांचे वडील आहात. आता जे आर्यन खानसोबत घडले त्यामुळे एक वडील म्हणून तुम्हाला चिंता किंवा कोणत्या गोष्टीची भीती वाटते का?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर परेश रावल यांनी तरुण मुलांना आपण कंट्रोल करु शकत नाही असे म्हटले आहे.
‘एक वडील म्हणून तुम्ही तुमची कर्तव्ये पूर्ण करता. पण तुम्ही तुमच्या मुलांचे आयुष्य कंट्रोल करु शकत नाही. मुले तरुण असतात, त्यांना त्यांचे आयुष्य जगायचे असते. त्यांनी विचार करायला हवा. तुम्ही मुलांच्या मागे-मागे जाऊ शकत नाही आणि त्यांना विचारु देखील शकत नाही की कुठे चालला आहे? काय करतोस? तुम्ही मुलांवर चांगले संस्कार करता. पण बाहेर जाऊन त्याने काही चुकीचे कृत्य केले तर तुम्ही काय करणार? त्यामुळे मुलांनी कोणतेही कृत्य करताना विचार करायला हवा की आपल्या वडिलांचे नाव खराब होणार नाही ना. कारण वडिलांनी मेहनत घेऊन स्वत:ची ओळख निर्माण केलेली असते’ असे परेश रावल म्हणाले.