लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा आज पार पडत आहे. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात मतदान होत असताना अनेक सेलिब्रिटींनी मतदानाचा हक्क बजावला. बॉलिवूडचे अभिनेते परेश रावल यांनीही मतदानाचा अधिकार बजावला. यावेळी माध्यमांशी संवाद साधत असताना त्यांनी मतदान न करणाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली. लोकशाहीमध्ये मतदान हा आपला मौलिक अधिकार आहे, असे सांगताना रावल म्हणाले, “सरकारने हे केले नाही, ते केले नाही, असा नेहमीच आरोप लोकांकडून होत असतो. पण तुम्ही जर आज मतदान केले नाही, तर त्यासाठी तुम्हीच जबाबदार असाल, सरकार नाही.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मतदानाच्या अधिकाराबाबत बोलत असताना मतदान न करणाऱ्यांना शिक्षा द्यावी, असेही त्यांनी सुचविले. “जे लोक मतदान करत नाहीत, त्यांना काही ना काही तरी शिक्षा दिलीच पाहीजे. एकतर त्यांच्यावरील कर वाढवावा किंवा इतर काहीतरी तरतूद करावी”, असे मत त्यांनी व्यक्त केले.

लोकसभा निवडणुकीतील पाचव्या टप्प्यात आज महाराष्ट्रातील १३ मतदारसंघात मतदान होत आहे. मुंबई सारख्या शहरात कोट्यवधी मतदारांना विनासायास मतदान करता यावे, यासाठी निवडणूक आयोगाने तयारी केली होती. मात्र मुंबईत अनेक ठिकाणी मतदारांनी गैरसोयीबाबत तक्रारी व्यक्त केल्या. ईव्हीएममध्ये बिघाड, वीजपुरवठा खंडीत होणे, अशा अनेक समस्या मुंबईकरांना मतदानाबाबत भेडसावत होत्या.

दक्षिण, दक्षिण मध्य, उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम, उत्तर पूर्व आणि उत्तर मध्य या सहा मतदारसंघात आज मतदान होत आहे. तर उर्वरीत महाराष्ट्रातील धुळे, दिंडोरी, नाशिक, कल्याण, पालघर, भिवंडी आणि ठाणे या मतदारसंघातही मतदान होत आहे.

उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्र हे सर्वाधिक ४८ लोकसभा मतदारसंघ असलेले राज्य आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार महाराष्ट्रात एकूण ८.९५ कोटी मतदार आहेत. त्यापैकी ४.६९ कोटी पुरुष आणि ४.२६ कोटी महिला मतदार आहेत. तर ५४०९ तृतीयपंथी मतदार आहेत. पाचव्या टप्यात एकूण ६९५ उमेदवारांचे नशीब आज मतपेटीत बंद झाले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paresh rawal suggests punishment for those who dont vote kvg